गुंतवणूकदारांसाठी आठ नवे म्युच्युअल फंड नुकतेच बाजारात दाखल झाले आहेत. सबस्क्रिप्शनसाठी हे फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. यामध्ये तीन इंडेक्स, दोन सेक्टोरल, फिक्स मॅच्युरिटी, व्हॅल्यू फंड आणि ELSS योजना आहेत. मागील चार आठवड्यापासून म्युच्युअल फंड मार्केट संथ होते. कारण, फक्त एक किंवा दोन नवे फंड बाजारात आले होते. मात्र, आता आठ योजना लाँच झाल्या आहेत.
मागील महिन्याचा विचार करता म्युच्युअल फंड मार्केटमध्ये तेजी होती. अनेक फंड हाऊसेसने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना बाजारात आणल्या होत्या. त्यात मागील चार आठवड्यात शांतता होती. मात्र, आता आठ योजना गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत.
कोणतीही न्यू फंड ऑफर बाजारात दाखल झाली की सर्व प्रथम हे लक्षात घ्यावे की, ही योजना का आणली असावी. फंड हाऊसकडे जास्तीत जास्त गुंतवणूकदार यावे तसेच फंडामधील गुंतवणूक वाढावी यासाठी सहसा नव्या योजना लाँच केल्या जातात.
काही वेळा फंड हाऊसेस नवीन आयडिया घेऊन गुंतवणूकदारांपुढे येतात. अशा योजना बारकाईने अभ्यासने फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ, एचडीएफसीने डिफेन्स फंड ही म्युच्युअल फंड योजना आणली आहे. हा फंड फक्त संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार नाही. अशा वेळी गुंतवणूकदारांनी बाराकाईने अभ्यास करायला हवा. नवख्या गुंतवणूकदारांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
काही गुंतवणूकदार त्यांच्या आवडत्या फंड हाऊसच्या नव्या योजनेत गुंतवणूक करण्यास लगेच तयार होतात. तर काही फंड मॅनेजरची प्रतिष्ठा आणि नाव पाहून गुंतवणूक करतात. काही गुंतवणूकदारांना स्वस्तात एनएफओ मिळत असतो म्हणून गुंतवणूक करण्यास तयार होतात. मात्र, तुमच्या आवडत्या फंड हाऊसची प्रत्येक नवी योजना चांगलीच असेल असे नाही.
तसेच जर एखाद्या स्कीमचा NAV फक्त 10 रुपये असेल तर ही योजना चांगलीच असेल असे नाही. ज्या योजना आधीपासून सुरू असतात त्यांचा एनएव्ही जास्त असण्याची शक्यता असते. तर नव्या योजनेचा एनएव्ही कमी असू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी सेबी अधिकृत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.