BMC Covid Scam: आज दिवसभर मुंबईत ईडीच्या (Enforcement Directorate-ED) अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी सुरू आहे. यात तत्कालीन काळातील बीएमसीमधील अधिकारी आणि काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. 2020 मध्ये कोविड निमित्त करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये तब्बल 12,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे.
मुंबई महापालिकेने 2019 मध्ये शहरातील कोविडचा संसर्ग वाढल्यानंतर विविध उपाययोजनांसाठी केलेल्या खर्चामध्ये 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी पुरावे देखील सादर केले होते. दरम्यान याबाबत कॅगनेही आपल्या अहवालात कोविड सेंटरच्या कामावरून ताशेरे ओढले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज ईडीने मुंबईतील काही व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले.
मुंबई महापालिकेने कोविडच्या काळात दहिसर येथे जम्बो कोविड केंद्र सुरू केले होते. हे केंद्र उभारण्याचे काम व्यावसायिक सुजित पाटकर यांच्या कंपनीला देण्यात आले होते. पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या नावाखाली दहिसर येथील कोविड सेंटरचे काम केले. या कामासाठी महापालिकेने पाटकर यांच्य कंपनीसोबत करार केला होता. पण त्या कंपनीने कराराचे पालन न करता महापालिकेची फसवणूक केली.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने ऑक्सिजन बेडसह रेग्युलर बेडचे सेंटर उभारताना अनेक गोष्टींवर वारेमाप खर्च तर केला. पण त्याचबरोबर कंपनीने प्रत्येकवेळी खोटी कागदपत्रे दाखवून हे कंत्राट मिळवले होते. यामध्ये वरळी येथील एनएसईएल, मुलुंड पश्चिममधील आणि दहिसरमधील कोविड सेंटर्सचा समावेश होता. या कंपनीला आरोग्य क्षेत्रामधला पुरेसा अनुभव नसतानाही त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये ऑगस्ट 2022 मध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे मालक पाटकर आणि त्यांच्या इतर भागीदारांवर गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, आज पुन्हा ईडीने या घोटाळ्याशी संबंधित मुंबईतील विविध व्यक्तींच्या घरांवर छापे मारले. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, तसेच खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या समावेश आहे. तसेच ईडीने मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरावरही छापे मारले.