Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IIP : देशाचं औद्योगिक उत्पादन 4%नी घटलं  

Industrial Output

Image Source : www.brecorder.com

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 साठीचे आर्थिक आकडे जाहीर झाले आहेत. आणि यामध्ये देशाचं औद्योगिक उत्पादन आधीच्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 4% नी खाली आलं आहे. मागच्या 22 महिन्यातील हा नीच्चांक आहे.

वाढत्या व्याजदरांचा (Increasing Interest rates) फटका अर्थव्यवस्थेला (India Economy) बसला असून त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातलं औद्योगिक उत्पादन (Industrial Output) 4%नी घटलं आहे. मागच्या 26 महिन्यातील ही नीच्चांकी कामगिरी आहे. यापूर्वी ऑगस्ट 2020मध्ये औद्योगिक उत्पादन 7.4%नी कमी झालं आहे.       

केंद्रीय अर्थमंत्रालया (Indian Finance Ministry) अंतर्गत येणाऱ्या सांख्यिकी विभागाने (Department of Statistics) ही आकडेवारी जाहीर केली आहे . विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आधीच्या महिन्याच्या तुलनेत औद्योगिक उत्पादन 0.3% वाढेल असा रिझर्व्ह बँकेसह प्रमुख संशोधन कंपन्यांचा अंदाज होता.       

औद्योगिक उत्पादन का घटलं?     

कोव्हिड नंतर हळू हळू औद्योगिक हालचाली पूर्वपदावर येत होत्या. पण, कोव्हिडच्या धक्क्यातून सावरायला सगळ्यांना वेळ लागतोय. कोव्हिड नंतरच्या काळात वाढलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (Reserve bank of India) व्याजदर (Interest Rates) वाढवले. त्यामुळे कर्जं महाग झाली. आणि उद्योगांसाठी वित्तपुरवठा कर्जाच्याच माध्यमातून होत असतो.       

कर्ज महाग झाल्यामुळे कंपन्यांनी विस्तार तसंच नोकर भरतीच्या योजना पुढे ढकलल्या . आणि त्यातून उत्पादन घटलं.       

दुसरीकडे कर्ज महाग झाल्यामुळे लोकांकडून वस्तू आणि सेवांसाठी असलेली मागणीही कमी झाली. या दुष्टचक्रामुळे औद्योगिक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचा वाटा 16% आहे. आणि आगामी काळातही भारतीय रिझर्व्ह बँकेचं व्याज दरवाढीचंच धोरण असेल असं अर्थतज्ज्ञांना वाटतं. फेब्रुवारीपर्यंत दरवाढ सुरूच राहील. औद्योगिक उत्पादनाचे आकडे पडलेले असताना देशात महागाईचा दर मात्र 5.9% पर्यंत सिमीत राहिला आहे. आणि ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत परिस्थिती हळू हळू सुधारू शकते.      

काही उद्योग क्षेत्रांचा स्वतंत्रपणे विचार केला तर खाणउद्योग आणि वाहन क्षेत्राच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तर वस्त्रोद्योग, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन यात घट झाली आहे. आणखी एक महत्त्वाचा आकडा म्हणजे नोव्हेंबर महिन्यात देशाचा बेरोजगारीचा दर 8%वर होता.