अलीकडील काळात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. बांधकाम क्षेत्र , कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी , कृषी क्षेत्रात सर्वेक्षण करण्यासाठी तसेच मनोरंजन क्षेत्रात देखील ड्रोनचा वापर आता सामान्य झाला आहे. वाहन खरेदी करताना तुम्ही त्याचा विमा उतरवता , जेणेकरून अपघात झाल्यास संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येईल. परंतु ड्रोनबाबत असे काही नियम आहेत का ? हे आपण बघणार आहोत.
ड्रोन विमा आवश्यक का ?
ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे ड्रोन अपघाताच्या बातम्या देखील येऊ लागल्या आहेत. मागच्याच महिन्यात ख्रिसमसच्या दिवशी दिल्लीत एक डिलिव्हरी घेऊन जाणार ड्रोन क्रॅश झाला. यामध्ये ड्रोन आणि सामान दोघांचेही नुकसान झाले. अशा परिस्थितीत होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोण देणार हा नेमका मुद्दा आहे. त्यामुळे ड्रोन विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय लोकांसाठी ड्रोन सुविधा नवीन असल्याकारणाने त्यासंबंधीचे नियम देखील अलीकडच्या काळातच बनले आहेत. या सगळ्यांचा विचार करता कायद्याच्या कक्षेत राहून योग्य ती काळजी घेणे ड्रोन कंपनी आणि ड्रोन मालक यांची जबाबदारी आहे.
काय सांगतो कायदा ?
ड्रोन नियम 2021 नुसार ,250 ग्राम पेक्षा मोठ्या ड्रोनचा थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. 1988 च्या मोटार वाहन कायद्यातील तरतुदी ड्रोनच्या थर्ड पार्टी विमा आणि जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास लागू होतात. याद्वारे ड्रोनचा वापर करताना झालेले मालमत्तेचे नुकसान आणि लोकांना दुखापत झाल्यास त्याचे दायित्व असे संरक्षण मिळते.
विमा संरक्षण देणाऱ्या विमा संस्था
आधीच सांगितल्याप्रमाणे ड्रोन संबंधितले भारतीय नियम काही वर्षांपूर्वीच बनले आहेत. भारतातील ड्रोन विमा देणारे मार्केट देखील सध्या बाल्यावस्थेत आहे. फार थोड्या विमा संस्था ड्रोनसाठी विमा सुविधा पुरवतात. HDFC ERGO, ICICI Lombard, Bajaj Allianz, TATA AIG आणि New India Insurance सध्या ड्रोनसाठी विमा सुविधा प्रदान करत आहेत.