Dragon Fruit Farming: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात राहणारे सरला आणि जगन्नाथ चव्हाण यांची एकूण पाच एकर शेती आहे. त्यांनी या शेतीमध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा, मका अशी पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु, उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ काही बसत नव्हता. त्यामुळे काही तरी वेगळं करण्याचा विचार दोघांच्याही मनात सुरु होता.
Table of contents [Show]
'अशी' झाली सुरुवात
2018 मध्ये दूरचित्रवाणीवर ड्रॅगनफ्रूट पिक कसे घ्यायचे? या संबंधित कार्यक्रम चव्हाण दांपत्यांनी बघितला. त्यावेळी चव्हाण दांपत्यांना हवामान, पाणी व बाजारपेठ या सर्वांचा विचार करता, हे पीक फायदेशीर असल्याचे वाटले. त्यामुळे चव्हाण दांपत्यांनी 2019 मध्ये तीन एकरांमध्ये ड्रॅगन फ्रूटचे पिक घेतले.
आत्मविश्वास वाढला
चव्हाण दांपत्याला पहिल्या वर्षी केवळ 3 ते 4 टन उत्पादन हाती आले. दोघेही पती-पत्नी सतत या पिकाविषयी सातत्याने नवनवीन माहिती घेत होते. प्रत्येक वर्षी उत्पन्न वाढत गेल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. तसेच सेंद्रिय खतांसह जीवामृताचा वापर केल्याने मातीची सुपीकता वाढण्यास मदत झाली.
लाखोंचा नफा
चव्हाण यांच्या शेतात वर्षातून दोन-तीनदा ड्रॅगनफ्रूटचे पिक घेतले जाते. गेल्यावर्षी एक एकर मध्ये 14 टन उत्पादन निघाले आणि 3 एकरातील उत्पन्नापासून चव्हाण दांपत्याला 32 लाख रुपयांचा नफा झाला. 160 ते 220 रुपये किलो टन प्रमाणे या फळाची मार्केटमध्ये किंवा व्यापाऱ्यांना विक्री केली जाते, अशी माहिती सरला चव्हाण यांनी दिली.
स्वप्न पूर्ण झालीत
पूर्वी अनेक कबाड कष्ट करुनही पदरात काहीच पडत नव्हते, असा मागील काही वर्षाचा अनुभव होता. मुलांचे शिक्षण, घरखर्च, इतर खर्च तसेच शेती साठी घेतलेला खर्च कसा सांभाळायचा? याचे सतत टेंशन असायचे. परंतु आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमधून चांगला नफा मिळत असल्याने माझ्या कुटुंबाची सर्व स्वप्न पूर्ण झालीत, असे सरला चव्हाण म्हणाल्या.