CIBIL Score: आर्थिक व्यवहार चोख आणि वेळेत पार पाडणं कधीही फायद्याचं ठरतं. मात्र, प्रत्येकवेळी हे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही. कितीही प्रयत्न केले तरी कामाच्या घाईगरबडीत पेमेंट करायचं विसरून जातो. तसेच काही तांत्रिक आणि इतर अडचणीमुळेही क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर होऊ शकतो. अनेकांना हा प्रश्न पडतो की, एखादे पेमेंट करण्यास उशीर झाल्यास सिबील स्कोअर वर काय परिणाम होतो. तर याचे उत्तर ‘होय’ असे आहे. एक जरी बिल पेमेंट करण्यास उशीर झाला तरी सिबील स्कोअर खाली येऊ शकतो.
बील पेमेंट भरण्यास उशीर झाल्यास काय परिणाम होतो?
काही अपरिहार्य कारणामुळे किंवा पेमेंटची तारीख विसरल्यास त्याचा परिणाम क्रेडिट रिपोर्ट वर होतो. समजा तुमचा 800 सिबील स्कोअर आहे. आणि एका महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई केली तर तुमचा स्कोअर 50 ते 60 अंकांनीही खाली येऊ शकतो. तसेच ही माहिती तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसेल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज घेताना अडचण येऊ शकते. हा खाली आलेला स्कोअर सुधारण्यासाठी तुम्हाला पुढील काही महिने शिस्तीने चोख व्यवहार करावे लागतील.
कर्ज घेताना काय अडचणी येऊ शकतात?
ज्या ग्राहकांचा सिबील स्कोअर चांगला आहे त्यांना बँक कमी व्याजदराने कर्ज देते. मात्र, जर तुम्ही एकजरी पेमेंट करण्यास उशीर केला तरी तुमचा स्कोअर खाली येईल. यावेळी जर तुम्ही बँकेकडे कोणतेही कर्ज मागायला गेला आणि तुमचा क्रेडिट स्कोअर 800 वरुन 750-540 वर आला असेल तर बँक तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज देईल. हाच स्कोअर 800 असता तर कमी व्याजदराने कर्ज मिळाले असते.
उदाहरणार्थ, तुम्ही 45 लाख रुपये कर्ज 20 वर्षांच्या मुदतीने मागायला गेला तर तर बँक तुम्हाला जास्त क्रेडिट स्कोअर असताना 8.5% दराने व्याज देऊ शकते तर स्कोअर कमी झाल्यानंतर तुम्हाला 10 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर आकारेल. 8.5 व्याजदराने तुम्हाला सुमारे 48 लाख रुपये व्याज भरावे लागेल. मात्र, 10 टक्के व्याजदर आकारल्यास एकूण व्याज 60 लाखांपर्यंत जाईल. म्हणजेच 10 लाखांपेक्षा जास्त व्याजात तफावत येईल. त्यामुळे कोणत्याची पेमेंटची वेळ चुक न देणे शहाणपणाचे ठरेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            