मार्केटमध्ये सगळीकडे सध्या ओटीटी प्लॅटफाॅर्मचा बोलबाला आहे. त्यासाठी बऱ्याच वेबसाईट प्रसिद्ध आहेत. पण, या सर्वामध्ये अग्रभागी फक्त Disney+ Hotstar आहे. या स्ट्रीमिंगचा भारतात युझर बेसही सर्वांत जास्त आहे. आत्तापर्यंत ते प्रीमियम खात्याच्या युझरला 10 लोकांसह पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देत होते. परंतु, कंपनी आता त्याची मर्यादा 4 वर करण्याचा प्लॅन आखत असल्याची बातमी राॅयटर्सने दिली आहे.
वर्षाच्या शेवटी होईल धमाका!
Disney+ Hotstar ने हे धोरण कसे राबवता येईल यासाठी टेस्ट घेतल्या आहेत. तसेच, प्रीमियम युझर्ससाठी लॉग ईन 4 पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयापर्यंत कंपनी आली असून या वर्षाच्या शेवटी हे धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती एका सुत्राने राॅयटर्सला दिली आहे. मात्र, कंपनीने यावर कोणतीही कमेंट केली नसल्याचे त्यांनी बातमीत सांगितले आहे. Disney+ Hotstar ने हे धोरण लागू केल्यास, या प्रीमियम प्लॅनसह फक्त 4 डिव्हाईसमध्ये एकच पासवर्ड वापरता येणार आहे. तेच बेसिक किंवा स्वस्त प्लॅन घेतल्यास फक्त 2 डिव्हाईस वर तो पासवर्ड वापरता येणार आहे. म्हणजे, हे धोरण लागू केल्यावर इतर प्लॅनवरही याचा परिणाम होणार आहे.
सबस्क्राईबर वाढण्याची आशा
राॅयटर्सच्या बातमीनुसार, कंपनीला आशा आहे की, हे पाऊल उचलल्यास, सबस्क्राईबरची संख्या वाढायला कंपनीला मदत होईल. कारण, जे आत्तापर्यंत पासवर्ड शेअरिंगने स्ट्रीमिंगचा लाभ घेत होते. त्यांना आता सबस्क्रीप्शन घेणं भाग पडणार आहे. त्यामुळे कंपनी हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. Disney, Netflix, Amazon यांच्यासह JioCinema ही यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. या बिझनेसमध्ये JioCinema ने त्यांची पकड मजबूत केली आहे. तसेच, 2027 पर्यंत या क्षेत्रासाठी 7 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ बनणार, असल्याचा अंदाज मीडिया पार्टनर्स एशियाने वर्तवला आहे. याचबरोबर इंडस्ट्रीच्या डेटानुसार Hotstar मार्केटचा लिडर असून त्यांच्याजवळ अंदाजे 50 मिलियन युझर्स आहेत.
राॅयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, दुसऱ्या सुत्राचं म्हणणं आहे की, Disney+ Hotstar भारतातील त्यांच्या प्रीमियम युझर्सला असुविधा देऊ इच्छित नाही, त्यामुळे त्यांनी हे धोरण अजूनपर्यंत राबवलं नाही. तसेच, त्यांचे 5% प्रीमियम सबस्क्राईबरच 4 पेक्षा अधिक डिव्हाईसवर लाॅग ईन करतात. पण, तरीही हे नवीन धोरण राबवल्यास याचा परिणाम इतर स्वस्त प्लॅनवरही पडणार असल्याचं सुत्रानं म्हटलं आहे.