सध्या जागतिक मंदीचे सावट संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. याचा परिणाम असा की, अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कॉस्ट कटिंग (Cost Cutting) करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी मनोरंजन विश्वातील नामांकित कंपनी डिस्ने (Disney) कंपनीने कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय जाहीर केला होता. डिस्ने कंपनी 24 एप्रिलपर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 15 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. ही कपात वेगवेगळ्या विभागातून केली जाणार आहे.
Table of contents [Show]
कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतला?
गेल्या काही महिन्यांमध्ये डिस्ने कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले आहे. त्यात नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीला 1.47 बिलियन डॉलर्सचा (12,071 कोटी रुपये) तोटा झाला होता. त्यामुळे कंपनीने फेब्रुवारी महिन्यात कॉस्ट कटिंग करण्याच्या निर्णय घेतला होता.
15 टक्के कर्मचारी कपात होणार
कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी म्हणजे 2,20,000 कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनी कमी करणार आहे. यामुळे जवळपास 7000 कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. ही कपात केल्यानंतर कंपनीच्या खर्चातून अंदाजे 5.5 अब्ज डॉलर रुपयांची बचत होणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम 45 हजार कोटीहून अधिक आहे.
'या' विभागात केली जाईल कर्मचारी कपात
डिस्ने कंपनीच्या टेलिव्हिजन (TV), फिल्म, थीम पार्क आणि कॉर्पोरेट पदांवर काम करणाऱ्या विभागात कर्मचारी कपात केली जाणार आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी कंपनीने तयार केली असली, तरीही ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 24 एप्रिल 2023 पर्यंत ही नोकरकपात केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
नोकरकपातीचे चक्र सुरूच
गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी, ई-कॉमर्स आणि इतर खासगी क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवरचा खर्च हा अनावश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ॲमेझॉन (Amazon) कंपनीने मागील वर्षी 18,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तर ॲक्सेंचर कंपनीने 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. सतत चर्चेत असणाऱ्या ट्विटरने देखील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. आता या कंपन्यांच्या यादीत डिस्नेची भर पडली आहे. जगभरातील या नोकरकपातीमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.
Source: abplive.com