नुकताच संपलेल्या इंडियन प्रिमीयर लीगला मोफत दाखवून जिओ सिनेमाने नवा रेकॉर्ड केला होता. OTT प्लॅटफॉर्म्सवर क्रिकेट स्पर्धेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आगामी आशिया कप आणि क्रिकेट वर्ल्डकपची सिरिज मोफत प्रक्षेपण करण्याचा निर्णय 'डिस्ने+ हॉटस्टार'ने घेतला आहे.
डिस्ने आणि हॉटस्टारच्या या निर्णयामुळे क्रिकेट रसिकांना मोबाईलवर मोफत क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.सध्या डिस्ने हॉटस्टारवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 चे थेट प्रक्षेपण दाखवले जात आहे. त्यामुळे डिस्ने हॉटस्टारच्या युजर्समध्ये वाढ झाली आहे. आशिया कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप मोफत प्रक्षेपण केल्याने युजर्स वाढतील, असा कंपनीला विश्वास आहे.
क्रिकेटच्या मॅचेसचा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आनंद घ्या या उद्देशाने डिस्ने हॉटस्टारने आशिया कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे. भारतात डिजिटल क्रांतीने OTT प्लॅटफॉर्मला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
मागील दोन वर्षात OTT इंडस्ट्रीजमध्ये प्रचंड वृद्धी झाली आहे. या इंडस्ट्रीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे सर्वच प्रदेशातील प्रेक्षकांना परिपूर्ण आनंद घेता येतोय असे मत डिस्ने हॉटस्टारचे प्रमुख सजित शिवानंदन यांनी व्यक्त केले. आशिया कप आणि क्रिकेट वर्ल्डकपचे स्मार्टफोनवर मोफत प्रक्षेपण दाखवल्याने OTT वरील स्पोर्ट्सच्या इको सिस्टमला चालना मिळेल, असा विश्वास शिवानंदन यांनी व्यक्त केला.
IPL हंगामात डिस्ने हॉटस्टारने लाखो सबस्क्राईबर्स गमावले होते. जिओ सिनेमाने IPLचे मोफत प्रक्षेपण केले होते. यामुळे डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्राईबर्स जिओ सिनेमाकडे वळाले होते. याचा फटका डिस्ने हॉटस्टारला बसण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये डिस्ने हॉटस्टारचा महसूल 50% ने कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण असल्याने युजर्स पुन्हा डिस्ने हॉटस्टारकडे वळाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नुकताच डिस्ने हॉटस्टारने एकाच वेळी OTT वर लाईव्ह सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचा नवा रेकॉर्ड मोडला होता.