स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती भारत सरकारसोबत पुन्हा एकदा शेअर केली आहे. स्वित्झर्लंड आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार या आर्थिक माहितीची देवाणघेवाण करण्यात आली आहे. अशाप्रकारे स्विस बँकेतील भारतीयांच्या बँक खात्याची माहिती शेअर करण्याची पाचवी वेळ आहे.
स्वित्झर्लंड सरकारने भारतीय अधिकाऱ्यांसोबत स्वीस बँकेत (Swiss Bank) कोणाची वैयक्तिक बँक खाती आहेत. तसेच कॉर्पोरेट आणि ट्रस्टशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती शेअर केली आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
स्विस बँकेने वार्षिक माहिती आदान-प्रदान (Annual Automatic Exchange of Information-AEOI) कार्यक्रमांतर्गत पाचव्यांदा अशाप्रकारे माहितीचे आदान-प्रदान केले आहे. या उपक्रमांतर्गत स्वित्झर्लंडने 104 देशांसोबत अशी माहिती शेअर केली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशाचप्रकारे माहिती देण्यात आली होती. आता पुढच्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये माहिती दिली जाणार आहे.
स्विस बँकेकडून कोणती माहिती शेअर
स्वीस बँकेने भारत सरकारसोबत शेअर केलेल्या माहितीमध्ये खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, त्याचा पत्ता, ओळख क्रमांक अशी माहिती आहे. त्याचबरोबर खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे, हे माहिती सुद्धा आहे.याचबरोबर वित्तीय संस्था, ट्रस्ट यांची माहितीसुद्धा केंद्र सरकारसोबत शेअर करण्यात आली आहे.
104 देशातील खातेधारकांची नावे उघड
स्विस बँक म्हणजे काय? आणि तिथे भारतीय लोक का पैसे ठेवतात? हे सुद्धा तुम्हाला माहिती असेलच. पण आता ती गोपनीयता सुद्धा राहिलेली नाही. भारत आणि स्वित्झर्लंड सरकार यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार, ही माहिती शेअर केली जात आहे. भारताप्रमाणेच जगभरातील श्रीमंत व्यक्तींची स्विक बँकेत खाती आहेत. स्वित्झर्लंड बँक आतापर्यंत 101 देशांसोबत ही माहिती शेअर करत होती. पण यावर्षीपासून या यादीत कझाकिस्तान, मालदीव आणि ओमान या 3 नवीन देशांचा समावेश झाला आहे.