Disadvantage of Bank FD: पारंपरिक पद्धतीने बँकेत मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याला आजही प्राधान्य देतात. कारण एकच त्यामध्ये जोखीम नाही आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निश्चित परतावा मिळण्याची गॅरंटी. पण हे जरी खरं असलं तरी, मुदत ठेवीमुळे गुंतवणूकदारांचे बऱ्यापैकी नुकसान होते. कोणत्या गोष्टींमुळे नुकसान होते, हे आपण पाहणार आहोत.
गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून ग्रामीण भागासह शहरातील गुंतवणूकदारही एफडीला प्राधान्य देतात. दरम्यान मे, 2022 पासून आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली होती. त्यामुळे तर लोकांचा एफडीवर अजूनच विश्वास बसू लागला. आजही काही बँका मुदत ठेवींवर 8 ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा 0.50 टक्क्यांनी जास्त दर दिला जात आहे.
मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे एवढे सारे फायदे असताना त्याचे बरेच तोटेही आहेत. त्यातील काही निवडक घटक आपण समजून घेणार आहोत.
Table of contents [Show]
रिटर्न्समध्ये वाढ नाही
मुदत ठेवींचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे तुमच्या गुंतवणुकीत वाढच होत नाही. ज्या व्याजदराने तुम्ही गुंतवणूक करता तेवढ्याच दराने तुम्हाला परतावा मिळतो. त्यामध्ये काहीच वाढ होत नाही. त्या तुलनेत शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीत दररोज वाढ होताना दिसते.
फिक्स व्याजदर
फिक्स व्याजदर हा आजच्या काळात गुंतवणूकदारांवर होणारा अन्याय आहे. एकीकडे काही गुंतवणुकीवर दररोज चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार त्याचा फायदा सुद्धा गुंतवणूकदाराला मिळतो. पण एफडीमध्ये व्याजदर फिक्स असतो. तुम्हाला त्याची मुदत संपेपर्यंत नवीन व्याजदरासाठी वाट पाहावी लागते.
लॉक-इन-पिरिअड
एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही अडकून राहते. म्हणजे जेव्हा तु्म्हाला पैशांची गरज असते. तेव्हा तुम्ही पैसे काढू शकत नाही. काढले तर त्यावर मिळणाऱ्या परताव्यातून दंड कापला जातो. इमर्जन्सीमध्ये मुदत ठेवींमधील पैसे कधीच वापरता येत नाहीत.
टीडीएस
मुदत ठेवींवर मिळणारे व्याज हे टॅक्सेबल असते. म्हणजे तुमची एफडी मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर बँक टॅक्स आकारते. बँक टीडीएसच्या रूपाने टॅक्स कापूनच गुंतवणूकदाराला उर्वरित पैसे रिटर्न करते.
महागाई वाढते पण उत्पन्नात भरच नाही
एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर फिक्स व्याजच मिळते. महागाई वाढली तरी त्यामध्ये काहीच बदल होत नाही. उलट गुंतवणूक केलेल्या रकमेचे मूल्य कमीच होते. या योजनेमध्ये महागाईला बीट करतील रिटर्न्सच नाहीत. त्यामुळे महागाईला धरून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे ही चांगली कल्पना नाही.
लिक्विडिटी
मुदत ठेवींचा लिक्विडिटीशी काहीच संबंध नाही. उलट किमान 3-4 वर्षांसाठी पैसे लॉक होतात. जर तुम्ही एफडी मोडण्याचा विचार केला तर त्यावर बँक दंड आकारते. त्यामुळे तुमचे आणखी नुकसान होते.
बँक दिवाळखोरीत गेली तर...
मुदत ठेव ही सर्वांत सुरक्षित आणि जोखीम फ्री गुंतवणूक मानली जाते. पण एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर तुमचे नुकसान अटळच आहे. सध्या आरबीआयने मुदत ठेवींवरील 1 लाखाचा इन्शुरन्स 5 लाख रुपये केला आहे. पण तुमची एफडी त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचे नुकसान कसे भरून निघणार.
अशाप्रकारे मुदत ठेवींचे जितके फायदे सांगितले जातात. तितकेच त्याचे तोटेसुद्धा आहेत. एफडीवर साधा भांडवली नफा मिळत नाही. त्यामुळे अनेकांना एफडी सुरक्षित गुंतवणूक वाटत असली आणि त्यावर जास्त व्याजदर मिळत असला तरी गुंतवणूकदाराचे यातून वरीलप्रमाणे नुकसानच होते.