अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावाने भारतीय निर्यातदारांचे टेन्शन वाढवले आहे. आधीच मागील वर्षभरापासून रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक व्यापाराची घडी विस्कटलेली असताना आता नव्याने राजकीय संघर्षाने भारतातील हिरे उद्योगावर मंदीची ढग दाटले आहे. मागील तीन महिन्यांपासून मंदीमुळे हिरे उद्योगातील जवळपास 40% कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभरातव 20 हजारांहून अधिक कारागिरांचा रोजगार बुडाला आहे. मंदीचा प्रभाव वाढल्यास हिरे उद्योगातील आणखी हजारो कामगार बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अमेरिकेने चीनचा स्पाय बलून नष्ट केल्यानंतर दोन्ही देशांमधील संर्घष आणखी चिघळला आहे. याचा फटका भारतातील उद्योगांना बसला आहे. हिरे उद्योगासाठी अमेरिका आणि चीन दोन महत्वाच्या बाजारपेठा आहेत. हा भूराजकीय संघर्ष आणखी किती काळ सुरु राहील, याचा अंदाज कोणीच व्यक्त करु शकत नाही. त्यामुळे हिरे उद्योग मंदीच्या कचाट्यात सापडल्याचे जेम्स अॅंड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विपूल शहा यांनी सांगितले.
अमेरिका भारतातून हिरे आयात करणारा मोठा देश आहे. अमेरिकेनंतर चीनमध्ये भारतातून हिऱ्यांची निर्यात केली जाते. त्यामुळे या देशांतील घडामोडींचा परिणाम निर्यातीवर बसतो. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून हिरे उद्योगाला मंदीची झळ बसत आहे. यामुळे काटकसरीच्या हिरे व्यापाऱ्यांनी कारागिरांची संख्या कमी केली आहे. सूरतमध्ये हिऱ्यांना पैलु पाडणे, पॉलिशींग करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सूरतमधील छोट्या व्यापाऱ्यांनी कारागिरांची संख्या 40% ने कमी केली आहे. त्याचबरोबर आठवड्याचे कामकाजाचे दिवस 4 ते 5 दिवसांवर मर्यादित ठेवले आहे.
पॉलिश डायमंडच्या निर्यातीत 28.25% घसरण झाली. डिसेंबर 2022 मध्ये 1270.36 मिलियन डॉलर्सचे पॉलिश डायमंड एक्सपोर्ट करण्यात आले. डिसेंबर 2021 मध्ये 1770.61 मिलियन डॉलर्सचे पॉलिश डायमंड निर्यात करण्यात आले होते. जगभर विकल्या जाणाऱ्या एकूण हिऱ्यांपैकी 80% हे पॉलिश केलेले असतात. त्यामुळे भारतातील हिऱ्यांना जगभरात प्रचंड मागणी आहे.
कोरोना टाळेबंदीतून डायमंडची बाजारपेठ सावरत नाही तोच जागतिक मंदीने नवे संकट इथल्या व्यापाऱ्यांसमोर उभे केले आहे. मालाला उठाव नाही. वर्ल्ड मार्केटमधून ऑर्डर नसल्याने हिऱ्यांची निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे खर्च कमी करण्यासाठी अनेकांनी 30% नोकर कपात केली असल्याचे माहिती सूरत डायमंड असोसिएशनचे सचिव दामजी मवानी यांनी दिली. ते म्हणाले की आर्थिक वर्षातील चौथी तिमाही डायमंड उद्योगासाठी खूप महत्वाची असते. या कालावधीत निर्यात वाढते, मात्र यंदा डायमंड बाजारावर मंदी असल्याने सर्वांना 2008 च्या जागतिक मंदीच्या कटु आठवणी डोळ्यांसमोर येत असल्याचे मवानी यांनी सांगितले.
डायमंड हब असलेल्या सूरतमध्ये भीतीचे वातावरण
भारताचे डायमंड म्हणून गुजरातमधील सूरत शहराची ओळख आहे. सूरत शहरात 4000 हून अधिक छोटे मोठे डायमंड युनिट्स आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास 7.5 ते 8 लाख कारागिर काम करतात. मात्र मागील तीन महिन्यांपासून डायमंड उद्योगावर मंदीचे संकट वाढले आहे. हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने मागील महिनाभरात इथे 20 हजार कारागिरांनी नोकरी गमावली असल्याची डायमंड वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी सांगितले. ते म्हणाले की हिरे व्यापाऱ्यांकडे कारागिरांचा रोजचा भत्ता देण्यासाठी देखील पैसे नाहीत. त्यामुळे अनेकांनी युनिट्स बंद ठेवले असल्याचे टांक यांनी सांगितले. युरोप, अमेरिका आणि चीनमधील मंदीने सूरतमधील डायमंड मार्केटमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले असल्याचे टांक यांनी सांगितले.