शेअर बाजारात ट्रेडिंग करताना अचूक रणनीती ठरवण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावरील सल्ले, भाकिते ऐकतात, टेक्निकल चार्टही आपापल्या परीने पाहतात. पण तरीही कित्येकदा हे सर्व प्रयत्न करुनही प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना नुकसान पदरी येते. असे का होते? याचे कारण आपली एंट्री तरी चुकलेली असते किंवा एक्झिट तरी! काही वेळा दोन्हीही चुकलेले असते.
कसे ओळखायचे हे पॉईंट?
समजा तुम्ही निफ्टी (NIFTY)मध्ये ट्रेडिंग करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला त्या दिवसाची बाजाराची दिशा जाणून घ्यावी लागेल. जागतिक बाजारातील स्थिती समजून घ्यावी लागेल. यासाठी डाऊ फ्युचर्स (Dow Futures), नॅसडॅक फ्युचर्स (Nasdaq Futures), आशियातील बाजारात तेजीची स्थिती आहे की, हे सर्व बाजार-निर्देशांक पडलेले आहेत, हे पाहावे लागेल.
समजा या सर्वांतून सकारात्मक संकेत मिळत असतील आणि निफ्टीही वरच्या दिशेने कूच करत असेल तर आपल्यालाही त्यानुसार रणनीती ठरवता येते. यानंतर पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा तो म्हणजे आपण जेव्हा ट्रेडिंगसाठी बाजारात प्रवेश करणार आहोत तेव्हा निफ्टी नेमका कोणत्या पातळीवर आहे? तिथून पुढे त्याला रेझिस्टन्स कोणत्या पातळीवर आहे? तो किती मोठा आहे? या बाबी तपासाव्या लागतील. यासाठी NSEच्या संकेतस्थळावर जाऊन ऑप्शन चेन पहावी लागते. तेथे निफ्टीच्या सर्व पातळ्यांवर किती कॉल्स आणि किती पूटस् आहेत याची आकडेवारी दिलेली असते आणि साधारण दर 3 मिनिटांनी ती अपडेट होत असते.
या आकडेवारीसाठी दोन प्रमुख रकाने पहावेत. ओपन इंटरेस्ट (Open Interest) आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट (Change in Open Interest). चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये त्या दिवसातील ऑर्डर्सनुसार बदल होत असतात. या दोन्हीची बेरीज करावी. इथे जर कॉल्सच्या बाजूला असणारी संख्या पूटच्या बाजूच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर तिथे रेझिस्टन्स आहे समजावा. याउलट पूटच्या बाजूची बेरीज जिथे अधिक असेल तिथे सपोर्ट समजावा. पूटस् आणि कॉल्स या दोन्ही बाजूंमधील तफावत जितकी अधिक असेल तितके चांगले.
एकदा हे पाहिल्यानंतर चालू पातळी पाहून आपली रणनीती ठरवावी. उदाहरणार्थ, तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करताना निफ्टी 17157 च्या पातळीवर आहे. त्यावेळी ऑप्शन चेननुसार 17150 च्या पातळीवर पूट्ची संख्या कॉल्सपेक्षा बरीच अधिक असेल व 17200 च्या पातळीवर कॉल्सची संख्या पूट्च्या संख्येपेक्षा म्हणजे ओपन इंटरेस्टपेक्षा बरीच अधिक असेल तर सामान्यतः निफ्टी 17200 ची पातळी लवकर ओलांडणार नाही, असे मानले जाते. त्यानुसार आपण या टप्प्यावर कॉल खरेदी करणे अपेक्षित असते आणि साधारणतः निफ्टी 17175-80 च्या पातळीपर्यंत गेल्यानंतर तो कॉल विकून मोकळे होणे फायद्याचे ठरते.
असे न करता आपण जर इथे पूट खरेदी केल्यास 17150 वर स्ट्राँग सपोर्ट असल्यामुळे निफ्टी त्यापातळीच्या खाली शक्यतो येत नाही, परिणामी आपला पूट तोट्यात जाऊ शकतो. अर्थातच, ही अत्यंत सामान्य, प्राथमिक स्थिती सांगितली आहे. प्रत्यक्षात बाजार वर जाण्यास किंवा खाली येण्यास असंख्य गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे ऑप्शन चेनचा हा नियम प्रत्येक वेळेसाठी नाही, हे लक्षात ठेवावे.