दिल्ली महानगर पालिकेच्या महापौरपदी आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांची निवड झाली आहे. (Aam Adami Party Shaili Oberoi won Delhi Nagar Nigam Mayor Election) ओबेरॉय यांना केवळ 38 दिवस महापौर म्हणून काम करता येणार आहे. महापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम घोषीत करावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या शैली ओबेरॉय या उच्चशिक्षीत असून त्यांच्याकडे केवळ 23 लाख 94 हजार रुपये इतकी संपत्ती आहे. (Delhi New Mayor Shaili Oberoi having net worth of Rs 2394627 )
दिल्ली महानगर पालिकेच्या महापौरपदी आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांची आज निवड झाली. महापौर पदाच्या निवडणुकीवरुन तब्बल 84 दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु होता. यापूर्वी तीन वेळा झालेल्या बैठकांमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्या नगरसेवकांनी गोंधळ घातल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज बुधवारी 22 फेब्रुवारी 2023 चौथ्यांदा पालिकेची बैठक झाली. यावेळी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांची महापौर म्हणून निवड झाली. ओबरॉय यांना 150 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपच्या रेखा गुप्ता यांना 116 मते मिळाली.
दिल्लीच्या नवनिर्वाचित महापौर 39 वर्षीय शैली ओबेरॉय या दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पीएचडी मिळवली असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ओबेरॉय यांनी 2013 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 2020 मध्ये त्या आम आदमी पार्टीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. त्यांनी पटेल नगर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड नंबर 86 मधून पालिकेची निवडणूक अवघ्या 269 मतांनी जिंकली होती. त्यांनी भाजपच्या दिपाली कपूर यांचा पराभव केला होता.
शैली ओबेरॉय यांच्याकडे 23 लाखांची संपत्ती (Net Worth of Shaili Oberoi)
एडीआर मायनेता डॉट इन्फो या वेबसाईटनुसार आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांच्याकडे एकूण 2394627 रुपयांची संपत्ती आहे. ओबेरॉय यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शैली ओबेरॉय यांच्याकडे 12500 रुपये रोख रक्कम, बँका आणि इतर कंपन्यांमध्ये 719509 रुपयांची डिपॉझिट, एलआयसी आणि इतर विमा पॉलिसींमध्ये 886868 रुपयांची गुंतवणूक आहे. 175750 रुपयांचे 95 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याशिवाय शैली ओबेरॉय यांच्यावर 6 लाख रुपयांचे कर्ज आहे.
केवळ 38 दिवसांच्या महापौर
शैली यांनी महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक जिंकली असली तरी त्यांच्यासाठी हा अल्प काळासाठी आनंद ठरणार आहे. दिल्ली महापालिका कायदा 2 (67) नुसार दिल्ली महापालिकेचे वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. या वर्षापुरता महापौर निवडला जातो. त्यामुळे एप्रिल 2023 मध्ये पुन्हा महापौर निवडणूक घ्यावी लागेल. शैली ओबेरॉय यांना 31 मार्च 2023 पर्यंत महापौर म्हणून काम करता येईल.