आपल्या दैनंदिन आहारात डाळीचा समावेश केला जातो. या डाळीपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. वरण, इडली, डोसा यासारख्या पदार्थांमध्ये डाळींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र 2023 मध्ये डाळींचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. महागड्या डाळींमुळे घरगुती बजेटला धक्का लागायला सुरुवात झाली आहे. हरभरा, उडीद आणि मूग डाळीचे दर हे शंभरीपार गेले असून त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर होताना दिसत आहे.
Table of contents [Show]
हरभरा डाळीचा दर 8 ते 12 रुपयांनी वाढला
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यात हरभरा डाळीसाठी ग्राहकांना 105 ते 110 रुपये मोजावे लागत होते. हा दर सध्या वाढून 128 रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईमध्ये हरभरा डाळीचा दर जानेवारी महिन्यात 125 ते 128 रुपये प्रति किलो इतका होता. जो 24 एप्रिलपासून 139 रुपये प्रति किलो झाला आहे. जवळपास 8 ते 12 रुपयांची दरवाढ किलोमागे झालेली पाहायला मिळत आहे.
7 ते 10 रुपयांनी उडीद डाळीचा दर वाढला
हरभरा डाळीसोबत उडीद डाळीच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये उडीद डाळीचा दर एका किलोमागे 118 रुपये इतका होता. जो सध्या वाढून 123रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात उडीद डाळ 125 रुपये प्रति किलो दराने मिळत होती. 24 एप्रिलपासून या डाळीसाठी ग्राहकांना 137 रुपये द्यावे लागत आहेत. काही दिवसांमध्ये या डाळीच्या दरात 7 ते 10 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मूग डाळीचा दर 10 ते 14 रुपयांनी वाढला
जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये मूग डाळीसाठी ग्राहकांना 103 रुपये द्यावे लागत होते. सध्या या दरात देखील वाढ झाली आहे. एक किलो डाळीसाठी ग्राहकांना सध्या 112 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईमध्ये मूग डाळीचा दर जानेवारी महिन्यात 124 रुपये प्रतिकिलो इतका होता. वाढलेल्या दरानंतर सध्या 1 किलो मूग डाळीसाठी ग्राहकांना 138 रुपये मोजावे लागत आहेत. या डाळीच्या दरामध्ये जवळपास 10 ते 14 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.
डाळींच्या किंमती वाढण्याचे कारण काय?
सध्या डाळीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेत डाळींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने डाळीचे भाव वाढत आहेत. याशिवाय सध्या म्यानमारहून हरभरा आणि उडीद डाळीची आयात थांबण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारात डाळींचे भाव आणखी वाढले की, चढ्या भावाने आयात करून डाळींची विक्री करून मोठा नफा कमावता यावा म्हणून सध्या डाळींचा साठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. डाळींच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास, सरकार खुल्या स्वरूपात डाळीची विक्री करून वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवू शकते.
Source: abplive.com