मसाल्या पदार्थांमधील महत्वाचा जिन्नस असलेले जिरे( Cumin Seed=Jeera) प्रचंड महागले आहे. मागील महिनाभरात जिऱ्याच्या किंमतीत सरासरी 30% वाढ झाली आहे. सोमवारी गुजरातमधील उंझा या मार्केटमध्ये एक क्विंटल (1 quintal = 100 Kg) जिरे 33000 रुपयांवर गेले. एक किलो जिऱ्याचा भाव 330 रुपयांवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
2 डिसेंबर 2022 रोजी जिऱ्याचा भाव प्रति क्विंटल 25085 रुपये इतका होता. त्यात महिनाभरात 30% वाढ झाली आहे. सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी जानेवारीतील फ्युचर डिलेव्हरीमध्ये जिरे दर प्रति क्विंटल थेट 33000 रुपये इतका वाढला. यंदा लागवड कमी झाल्याने जिरे आवक मर्यादित राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यात नवीन जिरे बाजारात दाखल होत असते. त्यापूर्वीच दर वाढल्याने शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पन्न मिळणार आहे.
गुजरातमध्ये जिऱ्याची सर्वाधिक लागवड केली जाते. देशात उत्पादित होणाऱ्या एकूण जिऱ्यापैकी 50% उत्पादन गुजरातमध्ये घेतले जाते. मात्र यंदाच्या हंगामात जिरे लागवडीत मोठी घट दिसून आली. 2.69 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील तीन हंगामांच्या तुलनेत यंदाची लागवड सरासरीपेक्षा 35% कमी आहे. त्यामुळे गुजरातमधील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. वर्ष 2022-23 या हंगामात देशात 2.7 ते 3 लाख टन जिरे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये लागवड कमी झाली असली तरी शेजारच्या राजस्थानमध्ये 5.79 लाख हेक्टरवर जिरे लागवड झाली आहे. शेतमालासाठीचा कमॉडिटी एक्सचेंज असलेल्या एनसीडीईएक्समध्ये जिऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट 33090 प्रति क्विंटल इतका वाढला होता. त्यात आधीच्या दिवसाच्या तुलनेत 5.99% वाढ झाली. इंट्रा डेमध्ये जिऱ्याचा वायदा 33845 रुपयांपर्यंत वाढला होता. चीनमधून जानेवारी ते मार्च या काळात जिऱ्यासाठी मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रमजानच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधून जिरे मागणी वाढू शकते, असे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
जिरा निर्यातीत झाली घसरण
एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधील जिरे निर्यातीत 18.92% घसरण झाली. भारतातूल 122015.13 टन जिरे निर्यात करण्यात आले. वर्ष 2021 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 150479.11 टन जिरे निर्यात करण्यात आले होते.