सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे आज कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण झाली. क्रूडचा भाव प्रती बॅरल 80 डॉलर खाली आला आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची पातळी गाठल्याने भारतासह उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना फायदा होणार आहे. जानेवारी 2022 नंतर पहिल्यांदाच क्रूडचा भाव 80 डॉलर खाली आला आहे. ब्रेंट क्रूड 79 डॉलर तर यू.एस क्रूडचा भाव प्रती बॅरल 74.22 डॉलर इतका खाली आला. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून लवकरच पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
आशियाई कमॉडिटी बाजारात आज बुधवारी 7 डिसेंबर 2022 रोजी ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल 79.52 डॉलर इतका होता. त्यात 4% ची घसरण झाली. यू एस क्रूड फ्युचर्सचा भाव 3 सेंट्सने कमी झाला आणि तो 74.22 डॉलर प्रती बॅरल इतका होता.अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षाही चांगली राहिली. त्याचबरोबर सेवा क्षेत्र सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहे.यामुळे फेडरल रिझर्व्हकडून आगामी पतधोरणात व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून क्रू़डच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी ब्रेंट क्रूडचा भाव 97 डॉलर प्रती बॅरल होता.त्याआधीच्या महिन्यात तो 84 डॉलर होता.अमेरिका आणि युरोपातील देशांनी रशियन क्रूड ऑइलसाठी दर निश्चित केला आहे. त्याचा परिणाम मार्केटवर दिसून आल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले. ओपेक देशांचा समूह आणि रशियाने क्रूडच्या घसरणाऱ्या किंमती रोखण्यासाठी उत्पादन कपातीचे संकेत दिले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव 139 डॉलरपर्यंत वाढला होता. मात्र उत्पादनातील वाढ आणि पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तेलाच्या किंमतीत घसरण झाली.आता तेलाचा भाव रशिया-युक्रेन युद्धपूर्व पातळीवर आल्याने भारतीय कंपन्यांना इंधन दर कपातीसाठी संधी निर्माण झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त
मागील सहा महिन्यांहून अधिक काळ भारतात पेट्रोल आणि डिझेलचा भाव 6 एप्रिल 2022 पासून स्थिर आहे.मार्च महिन्यात भारतातील तेल वितरक कंपन्यांनी सरासरी 112.8 डॉलरने कच्च्या तेलाची खरेदी केली होती.आता हे प्रमाणे 82 डॉलर प्रती बॅरल इतके खाली आले आहे. त्यामुळे कंपन्या तूर्त मार्जिन रिकव्हरी करत असल्याचे बोलले जाते.पेट्रोल आणि डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे जेव्हा क्रू़डचा भाव वाढतो तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. मात्र मागील तीन महिन्यांपासून क्रूड ऑइल स्वस्त होत असताना पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कपातीबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे. त्यामुळे भारतीयांना चढ्या दराने इंधन खरेदी करावी लागत आहे. पेट्रोलियम कंपन्यांना एक लिटर डिझेलवर 4 रुपयांचा तोटा होत आहे तर पेट्रोलवरील तोटा आता भरुन निघाला आहे. क्रूडचा भाव 80 डॉलरखाली गेल्याने कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी कपात केली जाण्याची शक्यता आहे.