• 03 Oct, 2022 22:39

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबाबत सतत पडणारे प्रश्न?

Credit Card FAQ

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

आता बँकेतील व्यवहार करायला थेट बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. किती तरी प्रकारचे अॅप, कार्ड, मशीन याद्वारे बँकेची कामं करणं सोपं झाले आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. (Debit Card and Credit Card) या दोन्ही कार्डची रचना साधारणपणे समानच असते. पण या कार्डवरून मिळणाऱ्या सुविधा मात्र वेगवेगळ्या आहेत. या कार्डच्या माध्यमातून कॅश काढणे, शॉपिंग करणे यासारखी काही कामे सहजपणे होऊ शकतात.

डेबिट कार्डद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम काढू शकता. तर क्रेडिट कार्डची सुविधा बँक प्रत्येक ग्राहकाला देत नाही. क्रेडिट कार्डधारक खात्यात पैसे नसताना ही क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करू शकतो. पण डेबिट कार्डचे काम क्रेडिट कार्ड करू शकत नाही आणि क्रेडिट कार्डचे काम डेबिट कार्ड करू शकत नाही, हे मात्र खरं आहे. कसं ते समजून घेण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड म्हणजे काय? आणि त्याबद्दलची आवश्यक माहिती जाणून घेऊ.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय? What is Credit Card?

क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो. त्याला किमान महिन्याभराचे क्रेडिट मिळते. म्हणजे त्या कालावधीत तो त्याच्या सोयीप्रमाणे ते पैसे परत करू शकतो. पण याचे बिल भरण्यास दिलेल्या मुदतीपेक्षा जास्त वेळ लागला तर बॅंका / फायनान्शिअर कंपन्या त्यावर व्याज आकारतात.

क्रेडिट कार्ड रचना ही साधारणपणे बँकेतून घेतलेल्या अल्प-मुदतीच्या कर्जासारखी आहे; जे तुम्हाला एका ठराविक वेळेसाठी पेमेंट करू देते किंवा रोख पैसे काढण्याची सवलत देते. प्रत्येक खरेदीवर याचे पैसे परत करण्याऐवजी बिलिंग सायकलच्या शेवटी म्हणजे दिलेल्या मुदती अगोदर एकत्रित पैसे भरण्याची सोय यात असते.


सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे काय? What is Secured Credit Card?

सुरक्षित क्रेडिट कार्ड नियमित क्रेडिट कार्डप्रमाणेच काम करते. सामान्य आणि सुरक्षित क्रेडिट कार्डमधील फरक एवढाच आहे की, सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी जोखीम पातळी कमी व्हावी म्हणून फिक्स डिपॉझिटच्या बदल्यात कार्ड दिले जाते. ज्यांची बँकेतील क्रेडिट हिस्ट्री खराब आहे; त्यांच्यासाठी सुरक्षित क्रेडिट कार्ड फायदेशीर ठरू शकते. पण तुम्ही जर पेमेंट वेळेवर केले नाही तर, क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्या ठेवीतून रक्कम वजा करू शकते.

क्रेडिट कार्डचे स्टॅण्डर्ड क्रेडिट कार्ड आणि स्पेशलाईज्ड क्रेडिट कार्ड असं दोन प्रकारात विभाजन केलं जातं. (Standard Credit Card and Specialised Credit Card)

स्टॅण्डर्ड क्रेडिट कार्ड (Standard Credit Card)

हे क्रेडिट कार्ड साधारण क्रेडिट कार्डसारखेच आहे. यात बेसिक फिचर आहेत आणि कोणतेही वार्षिक शुल्क नाही.

स्पेशलाईज्ड क्रेडिट कार्ड (Specialised Credit Card)

हे क्रेडिट कार्ड कार्डधारकाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. या कार्डवरून फूड, इंधन, प्रवास इत्यादींवर विशेष सूट (Special Discount on Food, Fuel, Travel) मिळते. 

क्रेडिट कार्डचे वर्गीकरण 

सामान्य कार्ड (General Cards)

जनरल क्रेडिट कार्डवर बेसिक फिचर्स लागू असतात आणि तुलनेने त्याची वार्षिक फी (Annual Fee) कमी असते. 

रिवॉर्ड पॉईंट्स कार्ड (Reward Points Card) 

क्रेडिट कार्ड धारकांना प्रत्येक खरेदीसाठी रिवॉर्ड पॉईंट दिले जातात. कार्डधारक जितका जास्त खर्च करेल, तितके जास्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. हे रिवॉर्ड पॉईंट्स गिफ्ट व्हाऊचर, कूपन आणि वेगवेगळ्या ऑफर्स मिळवण्यासाठी रिडीम केले जाऊ शकतात.

कॅश-बॅक क्रेडिट कार्ड) (Cash-Back Credit Cards)

रिवॉर्ड क्रेडिट कार्डमध्ये कार्डधारकाला रिवॉर्ड पॉईंट्स दिले जातात. तर कॅश-बॅक क्रेडिट कार्डमध्ये कार्डधारकाला रोख रक्कम ऑफर केली जाते. जेव्हा कॅश-बॅक क्रेडिट कार्ड वापरले जाते. तेव्हा कार्डधारकाच्या खर्चातील विशिष्ट टक्के रक्कम कार्डधारकाच्या खात्यात परत जमा केली जाते.

आता तुमच्या मनात विचार आला असेल की, क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा आणि ते मिळविण्यासाठी किती वेळ लागतो?

क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तुम्ही बँकेत जाऊनही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून तुमच्याशी संपर्क साधून इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता केली जाते. जसे की, तुमची ओळख पटवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा पुरावा तुमच्याकडून मागितला जातो. 
तुमचा रीतसर भरलेला अर्ज मिळाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत तुमच्या अर्जावर बँकेकडून प्रक्रिया केली जाते. तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्‍यास, तुमचा अर्ज स्‍वीकारल्‍यानंतर अवघ्या 7 दिवसांत तुम्‍हाला तुमचे नवीन क्रेडिट कार्ड मिळू शकते. बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड अर्जाच्या प्रोग्रेसबद्दल एसएमएस किंवा ईमेलद्वारे वेळोवेळी माहिती देते.

तुम्ही क्रेडिट कार्डसाठी पात्र आहात की नाही हे कसे ओळखायचे?

यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर दिलेले पात्रता निकष तपासून क्रेडिट कार्डसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेऊ शकता. तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड विभागातील ग्राहक सेवा अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

क्रेडिट कार्डविषयी असेच तुमच्या मनातील आणखी काही प्रश्न पुढच्या लेखामध्ये जाणून घेऊ.