नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card) असतात. हल्ली बँक पण तुमच्या खात्यावर लक्ष ठेऊन असतात. त्यानुसार ठराविक रकमेपर्यंतच्या मर्यादेनुसार क्रेडिट कार्ड (Credit Card) देत असतात. पण एकदा का क्रेडिट कार्डवर खरेदीची सवय लागली की, आपण खरेदीसाठी हात मोकळा सोडतो. त्याचा परिणाम क्रेडिट कार्डचं बिल भरताना जाणवतो आणि बिल भरण्यास उशीर झाल्यास दंडही भरावा लागतो. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड बंदही करू शकता. क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी कोणत्या बाबींचा विचार करावा आणि क्रेडिट कार्ड कसे बंद करायचे ते पाहुया.
थकबाकी पूर्ण भरा
क्रेडिट कार्डच्या (Credit card) थकित बिलावर नुसतेच व्याज नाही, तर व्याजावर व्याज आकारले जाते. आपण केलेल्या आर्थिक व्यवहारांना 3,6,9 महिन्यांच्या कालावधीत परतावा करण्याची आपण तरतूद करत असतो. बँक मूळ रकमेवर व्याज नियमितपणे आकारत असते. क्रेडिट कार्ड (Credit card ) बंद करताना आपली पूर्ण देय रक्कम बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींकडून विचारून घेतली पाहिजे. अन्यथा, हे व्याज दर महिन्यात वाढत जातं. ही रक्कम भरल्याने बँकेचा आणि तुमचा व्यवहार तर संपतोच. शिवाय, तुमच्या क्रेडिट स्कोअर (Credit score) ला सुद्धा धक्का लागत नाही. तुम्हाला जर काही कारणामुळे जुन्या क्रेडिट कार्डची देय रक्कम देणं शक्य होत नसेल, तर तुम्ही बॅंकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींच्या मदतीने ती रक्कम नवीन कार्डमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता.
'एसआय' बंद करा (Standing Instruction)
आपल्या क्रेडिट कार्डवर आपण बऱ्याच वेळेस काही OTT माध्यमांचे वार्षिक सबस्क्रिब्शनचे ऑटो-रिन्युअल लावलेले असतात. हे सर्व सबस्क्रिब्शन क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी आठवणीने बंद केले पाहिजेत. बँकेला आपण दिलेली ही दर महिन्याची सूचना बँक आपण सांगितल्याशिवाय रद्द करत नाही. ही सूचना रद्द करावी अन्यथा, बँक तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करेल, तसेच दंड आकारेल आणि बिलाची रक्कम वाढत जाईल. तुम्हाला बँकेकडून नो-ड्युज प्रमाणपत्र (No-dues certificate) किंवा तसा इमेल जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुमचं क्रेडिट कार्ड बंद झालेलं नसतं.
नवीन क्रेडिट कार्ड आधी बंद करा!
तुमच्याकडे जर एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर त्यापैकी जे कार्ड नवीन आहे ते आधी बंद करावं. तुम्ही वापरत असलेलं जुनं क्रेडिट कार्ड हे तुम्हाला नवीन कर्ज घेण्यासाठी, इतर बँकांच्या क्रेडिट कार्डच्या ऑफर मिळवण्यासाठी पात्र करत असतं. जुन्या क्रेडिट कार्डमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असतो. ते क्रेडिट कार्ड बंद करण्या ऐवजी नवीन क्रेडिट कार्ड बंद करण्याचा पर्याय निवडा. नवीन कर्ज हवे असेल तर क्रेडिट कार्ड सुरू ठेवा एखादं क्रेडिट कार्ड बंद केलं, तर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit score) सुधारतो असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. पण, तसं न होता क्रेडीट कार्ड बंद केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit score) कमी करत असतो. जास्त क्रेडिट स्कोअर (Credit score) असेल तर तुम्ही कमी व्याजदराच्या कर्जासाठी पात्र असतात. तुम्हाला जर येत्या काळात गृह कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर, त्यावेळेस तुमचं क्रेडिट कार्ड बंद करण्याची घाई करू नका.
क्रेडिट कार्ड कसं बंद करायचं?
क्रेडिट कार्ड (Credit card ) बंद करण्यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज (Application) करावा लागेल. हे ऑनलाईन देखील करता येते. बऱ्याच बँकांमध्ये क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करता तेव्हा काही बिलं भरायची शिल्लक असल्यास बँक त्याकरता एक लिंक पाठवते. त्यावरून बिल भरल्यानंतर तुमचा अर्ज पुढे पाठवला जातो. कस्टमर केअर विभागाला (Customer Care) कार्ड बंद करण्याबाबत सांगून काही होत नाही. ठरलेली प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय क्रेडिट कार्ड बंद केले जात नाही. कार्ड बंद करण्याचा अर्ज दिल्यानंतर त्याबाबत बँकेकडून जोपर्यंत कार्ड बंद केल्याचा संदेश येत नाही, तोपर्यंत कार्ड बंद झाले असं गृहीत धरू नका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार जर तुम्ही बँकेच्या क्रेडिट कार्डची सर्व बिल भरली असतील तर तुम्ही अर्ज केल्या दिवसापासून 7 दिवसाच्या आत क्रेडिट कार्ड बंद करणे बंधनकारक आहे. बँकेने तसे केले नाहीतर बँकेलाच दंड भरावा लागणार आहे.