• 03 Oct, 2022 22:51

क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का?

Credit Card

क्रेडिट कार्ड वापरासाठी आर्थिक शिस्त आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यावर आकारले जाणारे शुल्क किती आहे. तुमच्याकडून किती वसूल केले जाते याची माहिती असणे आवश्यक आहे.

रोख पैशांना पर्याय म्हणून सध्या बाजारात प्लॅस्टिक कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय असे विविध पर्याय उपलब्ध आहेत आणि सध्या डिजिटायझेशनच्या जगात या सर्व गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत. यात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तसे पाहिले तर क्रेडिट कार्डचा वापर करणं ही फायद्याची गोष्ट आहे. पण त्याचा वापर त्या पद्धतीने केला गेला पाहिजे. 

तुमच्या खिशात रोख पैसे नसतानाही तुम्ही खरेदी करू शकता. खर्च करू शकता. हा क्रेडिट कार्डचा सर्वांत महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा असा की, क्रेडिट कार्डवरून खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे तुम्हाला किमान 40 ते 45 दिवसानंतर भरले तरी चालतात. म्हणजेच क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊन त्याचे पैसे महिन्याने भरू शकता. अशाप्रकारे क्रेडिट कार्डद्वारे नियमांना धरून तुम्ही सतत खरेदी करत असाल तर तुमची क्रेडिट हिस्ट्री (Credit History) तयार होते. जी तुम्हाला कर्ज घेताना खूप उपयुक्त ठरते. पण क्रेडिट कार्ड वापरताना त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला चांगलाच आर्थिक भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना त्यावर कोणत्या प्रकारचे शुल्क (Charge) आकारले जाते आणि ते भरले नाही तर त्यावर दंड किती आणि कसा आकारला जातो. याचे नियम आपण समजून घेणार आहोत.

सध्या बाजारात असलेल्या क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून किमान घटकांवर शुल्क आकारले जाते. हे शुल्क कोणते आणि किती प्रमाणात आकारले जाते, ते आपण पाहणार आहोत.

क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे शुल्क (Charges on credit card)

वार्षिक देखभाल दुरूस्ती शुल्क (Annual Maintenance Charge)

फक्त क्रेडिट कार्डच नाही तर डेबिट कार्डसाठी सुद्धा बॅंका वर्षाला काही शुल्क (Fee) आकारतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना बॅंका यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काची (फी) कल्पना देतात. ही फी वर्षांतून एकदा आकारली जाते. ती संबंधित ग्राहकाच्या खात्यातून थेट डेबिट होते. याची पूर्वकल्पना बॅंक ग्राहकांना वेळोवेळी देत असते. 

इंटरेस्ट रेट (Interest on Credit Card)

क्रेडिट कार्डवर खरेदी केलेल्या वस्तूची किंमत दिलेल्या मुदतीत भरली नाही तर बॅंका त्यावर मुदत संपलेल्या दिवसापासून व्याज आकारायला सुरूवात करतात. इथे तुम्हाला सर्व रक्कम भरावीच लागते. तुम्ही जर अर्धी रक्कम भरत असाल तरीही उरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने आकारले जात असल्याने याचा कार्डधारकाला मोठा भुर्दंड पडू शकतो. उदाहरणार्थ तुमचे क्रेडिट कार्डचे बिल 50 हजार रुपये आहे. त्यातील तुम्ही 30 हजार रुपये भरले आहेत. तर बॅंक उरलेल्या 20 हजारांवर 25 ते 30 टक्क्यांनी व्याज वसूल करते.

जीएसटी (Good & Service Tax-GST)

क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर जीएसटी (GST) आकारला जातो. त्यामुळे कोणतीही वस्तू क्रेडिट कार्डवर विकत घेताना त्यावर आकारला जाणारा टॅक्स आणि त्याच्या टॅक्स स्लॅबची माहिती करून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर जीएसटीवरील वार्षिक फी, इंटरेस्ट म्हणून दिले जाणारे पेमेंट आणि ईएमआयवर आकारली जाणारी प्रोसेसिंग फी यावर 18 टक्के दराने शुल्क वसूल केले जाते.

लेट पेमेंट (late payment)

क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यानंतर जसे 40 ते 45 दिवसांचे क्रेडिट मिळते. तसेच एखाद्यावेळी बिलाचे सर्व पैसे भरले नाही तर चालते. पण याचा लाभ घेण्यासाठी बॅंकेत ठराविक रक्कम भरावी लागते. जर एखाद्याने ही रक्कम दिलेल्या मुदतीत भरली नाही तर बॅंक त्याच्याकडून लेट पेमेंट म्हणून विशिष्ट फी वसूल केली जाते. ही फी शिल्ल्क राहिलेल्या रकमेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये 100 ते 500 रूपये शिल्लक असतील तर त्यावर बॅंक लेट पेमेंट फी म्हणून 100 रूपये आकारू शकते आणि शिल्लक रक्कम 10 हजारांपेक्षा जास्त असेल तर त्यावर लेट पेमेंट फी म्हणून 750 रूपये आकारू शकते.

कॅश अॅडव्हान्स फी (cash advance fee)

क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डच्या लिमिटनुसार एटीएममधून पैसे काढू शकता. पण अशाप्रकारे क्रेडिट कार्डमधून पैसे काढणं महागडं ठरू शकतं. कारण क्रेडिट कार्डमधून काढलेल्या रकमेवर 2.5 पट रक्कम बॅंकेला द्यावी लागू शकते. तसेच काही बॅंका क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढल्यावर त्यावर 100 ते 500 रुपये फी आकारतात.

फॉरेन करन्सी मार्क अप फी (Foreign currency mark up fee)

क्रेडिट कार्डद्वारे आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन केल्यावर त्यावर शुल्क आकारले जाते. बॅंका अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनवर फॉरेन करन्सी मार्क अप फी (Foreign currency mark up fee)च्या रुपात शुल्क वसूल करतात. हे शुल्क प्रत्येक बॅंकांमध्ये वेगवेगळे असू शकते.

क्रेडिट कार्ड ही बॅंकेद्वारे दिली जाणारी एक चांगली सुविधा आहे. पण तिचा योग्य पद्धतीने वापर होणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो.