Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कॉर्पोरेट बॉण्ड फंड ; ठेवींऐवजी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

corporate bond funds

Corporate Bond Fund: डेट गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये बँकेच्या नियमित ठेवी हा भारतीयांकडून सर्वाधिक स्वीकारला जाणारा पारंपरिक प्रकार आहे. परंतु आता हा पर्याय मागे पडत चालला आहे. ठेवींवरील व्याजदर सातत्याने घसरत चालले आहेत.

डेट गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये बँकेच्या नियमित ठेवी हा भारतीयांकडून सर्वाधिक स्वीकारला जाणारा पारंपारिक प्रकार आहे. परंतु आता हा पर्याय मागे पडत चालला आहे. ठेवींवरील व्याजदर सातत्याने घसरत चालले आहेत. विशेषतः मागील काही वर्षात तर ठेवींची लोकप्रियता पार घसरली आहे. अशा परिस्थितीत अल्प जोखींम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कंपन्यांचे रोखे म्हणजेच कॉर्पोरेट बॉण्ड हा बँक ठेवींऐवजी उत्तम पर्याय ठरु शकतो.

नव्या गुंतवणूक प्रकाराची ओळख

अपरिवर्तनीय डिबेंचर म्हणून ओळखले जाणारे कंपन्यांचे रोखे हे प्रामुख्याने डेट गुंतवणुकीचा पर्याय असून कंपन्या बँक कर्ज थेट उचलण्याऐवजी  रोख्यांची विक्री करुन आवश्यक निधी उभारतात. पतमापन दर्जा  प्रदान करणाऱ्या संस्थांकडून या रोख्यांची जोखीम निश्चित केली जाते. विक्रीस आलेल्या रोख्यांना ट्रीपल ए (AAA ) हा दर्जा असेल तर ते डबल ए ( AA ) दर्जा असलेल्या रोख्यांच्या तुलनेत अति सुरक्षित आणि कमी जोखीमेचे रोखे म्हणून समजले जातात.

सरकारी रोख्यांच्या तुलनेत जादा उत्पन्न देत कंपन्या या रोख्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी असलेल्या जोखीमेची भरपाई करतात. त्यामुळे कमी पतमापन दर्जा म्हणजेच AA+, AA, AA- and A+ या रोख्यांसाठी सरकारी तसेच AAA  रोख्यांच्या तुलनेत उच्च उत्पन्न आणि व्यापकता असते. परंतु त्यांच्यासाठी अधिक कर्जजोखीमही असते.परंतु योग्य दर्जाचे रोखे निवडण्याचे कसब हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय आव्हानात्मक असते. कारण त्यांच्याजवळ त्यासाठीचे कौशल्य, ज्ञान आणि बाजारावर सतत लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे त्यांनी कंपनी रोखे फंडाचा मार्ग अवलंबिला पाहिजे.

कंपनी रोखे फंड कसे कार्य करतो?

कंपनी रोखे फंड हे प्रामुख्याने डेट म्युच्यूअल फंड योजना आहेत. त्या प्रामुख्याने विविध कंपन्यांचे रोखे अथवा अपरिवर्तनीय डिबेंचरमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा गुंतवितात. सेबीच्या निर्देशानुसार, कंपनी रोखे फंडांनी आपला किमान 80 टक्के निधी हा उच्च पतमापन दर्जा असलेल्या कंपनी रोख्यांमध्येच गुंतविला पाहिजे. कमी दर्जाच्या रोख्यांमध्ये पैसे गुंतविणाऱ्या अन्य डेट फंडाच्या तुलनेत उच्च दर्जाच्या रोख्यांमध्ये आपला पैसा गुंतविणाऱ्या कंपनी रोखे फंडांची कर्ज जोखीम ही अतिशय कमी असते.

कंपनी रोखे फंडच का निवडायचा?

  • उच्च सुरक्षेची हमी (High on safety)
    उच्च पतमापन दर्जाच्या रोख्यांमध्ये आपला निधी गुंतविणे कंपनी रोखे फंडाला बंधनकारक असल्याने अन्य डेट फंडांच्या तुलनेत ते अधिक सुरक्षितता प्रदान करतात.
  • उच्च रोखता (Higher Liquidity)
    उच्च पतमापन दर्जाच्या रोख्यांमध्येच पैसा गुंतविल्याने या फंडांची रोखता अधिक असते. त्यामुळे या फंडाच्या व्यवस्थापकांना आपल्या पोर्टफोलिओत अधिक लवचिकतेने समतोल साधता येतो.
  • कामगिरीत स्थिरता (Steady performance)
    वित्तीय बाजाराने नुकत्याचे अनुभवलेल्या हेलकाव्यांमध्येही कंपनी रोखे फंडांनी अन्य डेट फंडांच्या तुलनेत स्थिर परतावा देत उत्तम कामगिरी बजावली आहे.
  • करबचतीचा फायदा (Tax benefit)
    कंपनी रोखे फंडांत किमान तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास दीर्घ मुदतीत झालेल्या भांडवली नफ्यावर महागाई निर्देशांक विचारत घेत भांडवली नफा करात 20 टक्के सवलत मिळते. बँकेच्या ठेवींवर प्राप्तीकराच्या टप्प्यांनुसार कर आकारला जात असल्याने उच्च कराच्या जाळ्यात असलेल्या बँक ठेवींच्या तुलनेत कंपनी रोखे हे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय होय.
  • कंपनी रोखे फंडात पोर्टफोलिओसाठी निधीची विभागणी (Corporate Bond Funds in portfolio allocation)
    आपल्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार तुमच्या डेट पोर्टफोलिओत अगदी काही महिन्यांपासून ते दोन ते तीन वर्ष मुदतीच्या फंडांचे मिश्रण असणे आवश्यक असते. चलन बाजारातील उच्च पतमापन दर्जा असलेले विविध आर्थिक साधने, उच्च दजाचे कंपनी आणि सरकारी रोखे यांचे तुमच्या डेट पोर्टफोलिओत मिश्रण हवे. कंपनी रोखे फंड हा तीनपेक्षा अधिक  वर्षाच्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. जर तुमचे तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणुकीचे उद्दीष्ट असेल तर डेट फंडासाठी तुम्हाला दीर्घ मुदतीच्या भांडवली नफा कराचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे कंपनी रोखे फंड हा तुमच्या मुख्य डेट फंड पोर्टफोलिओचा हिस्सा महत्वाचा भाग असला पाहिजे. घसरणीची कमी जोखीम आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीच्या कालावधीसाठी नफ्यावर उच्च कर परतावा यामुळे हे फंड तुम्हाला स्थिर परतावा मिळवून देऊ शकतात. त्यामुळे जर कंपनी रोखे फंड हे गुंतवणूक गरजेला मिळतेजुळते असल्याचे तुम्हाला जाणवत असल्यास तुम्ही आपल्या आर्थिक सल्लागाराशी याबाबत सल्लामसलत केलीच पाहिजे.