Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apparel market: रेडिमेड ब्लाऊज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, विक्रीत झाल 40 टक्क्यांची वाढ!

Sales of readymade blouses increased by 40 percent

Image Source : www.lbb.in

Apparel market: साडी विविध पद्धतीने नेसण्याकडे, आपली वेगळी स्टाईल स्टेंटमेंट दाखवण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. यासाठी रेडिमेड डिझाइनर ब्लाऊज घातले जातात. हे ब्लाऊज साडीव्यतिरीक्त लेहेंगा, स्कर्ट, हायवेस्ट पँट आदींवर घालता येत असल्यामुळे असे ब्लाऊज घेण्याकडे कल वाढला आहे आणि विक्रीतही मोठी वाढ झाली आहे, या ब्लाऊजांची किंमत काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Designer readymade blouses are in trend: फॅशन, कपडे हा सगळ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आपण खास कपड्यांची शॉपिंग करत असतो. सध्या प्रेझेंटेशनला महत्त्व आल्यामुळे कपड्यांची निवड, स्टाईल, ट्रेंड असे सगळे पाहूनच खरेदी केली जाते. आजकाल, कामाचे तास वाढले आहेत, घरी असल्यावरही ऑफिसचे काम असते. त्यात घरचे व्यवस्थापन या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे शॉपिंगला बाहेर पडण्यासाठी वेळेचे, कामाचे आणि दिवसाच्या वेळापत्रकाचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. जर, घरगुती समारंभासाठी शॉपिंग करायचे म्हटले, तर साडी पाहिजेच पण ब्लाऊज शिवायला जायला वेळ कोणाकडे, त्यात तो व्यवस्थित नाही झाला तर पुन्हा माप द्या, दुरुस्त करून घ्या असे सर्व करावे लागते. यावरील बेस्ट उपाय म्हणजे तयार ब्लाऊज घेणे. सध्या तयार ब्लाऊजांची विक्री तब्बल टक्क्यांनी वाढली आहे, असे मातोश्री गार्मेंटचे संचालक पवन मंडल यांनी सांगितले.

तयार ब्लाऊजांची खासियत (Specialty of ready made blouses)

काही वर्षांपूर्वी मिस-मॅच ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आला होता. पुढे, महिलांचा कल मिस-मॅचसह डिझाइनर ब्लऊज घालण्याकडे गेला. तर आता असे ब्लाऊज तयार घेतले जात आहेत. ज्यामुळे शिवण्यासाठीचा खटाटोप संपला. तयार ब्लाऊज डिझाइनर पद्धतीचा असल्यामुळे तो एकावेळी अनेक साड्यांवर वापरता येतो, हा प्रकार मिस-मॅचमध्येही होता, मात्र आता यात बदल असा की ब्लाऊज शिवण्याची पारंपरिक पद्धत बदलली आहे. ब्लाऊज हा मुळात कटोरी किंवा टग्ज न घालता साध्या पद्धतीने शिवला जातो. मग त्यावर, गळ्याला डिझाइन, लटकण, लेस अशा तत्सम गोष्टी लावल्या जातात. मात्र आता ब्लाऊजची बेसिकपद्धत बदलली आहे, आता ब्लाऊज मुख्यत्त्वे प्रिंसेस कट आणि स्ट्रेट लाईन ए कटपद्धतीने शिवले जाऊ लागले आहेत. यामुळे काय फरक पडला? तर, आपण सहजरित्या एकेरी पदर किंवा संपूर्ण शरीर कव्हर न करता एकाच खांद्यावरुन साडी नेसू शकतो.

प्रिंसेस कट किंवा स्ट्रेट लाईन ए कटमध्ये ब्लाऊज समोरून टॉपप्रमाणे दिसतो. त्याला बऱ्याचदा शर्टासारखी बटणे असतात, तर कधी टॉपप्रमाणे डोक्यातून घालता येतो. तसेच याला एका बाजून चेनही दिली जाते, कधी पाठिच्या बाजूने हुक दिलेले असतात. यात ब्लाऊजची उंची नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा कमीत कमी अडीच इंच ते जास्ताती जास्त 5 इंच जास्त असते. तर यात साधारणपणे बोट, यू, व्ही, चायनीज कॉलर, गोल, गळ्याभोवतीपर्यंत असे गळ्यांचे पॅटर्न असतात. हे तयार ब्लाऊज सगळ्यांना आकर्षक वाटतात ते म्हणजे त्यांच्यावरील डिझाइनमुळे!वेगवेगळे प्रिंटेंट पॅटर्न, कटवर्क, एम्ब्रॉयडरी, पेंटींग, सिक्वेन्स वर्क, ग्लिटरी, सिल्क काठ, कॉटन प्लेन अशा भिन्न भिन्न प्रकारच्या डिझाइनमुळे हे तयार ब्लाऊज लोकप्रिय झाले आहेत. अगदी रोजच्या साडीवर, खास समारंभाच्या साडीसाठी, किटी पार्टीसाठी, कॉफी डेट आदी सर्व प्रसंगासाठी, तशा प्रकारच्या सा़ड्यांसोबचत टीमअप करता येतील असे ब्लाऊज बाजारात आलेले आहेत. असे स्टायलिस्ट प्राची परांजपे यांनी सांगितले.

सध्या कॉलेज फंक्शन असो किंवा ऑफिस साडी नेसण्याकडे कल वाढला आहे, त्यात साडी नेसण्याचे विविध प्रकार आल्यामुळे प्रत्येकाला वेगळेपणा दाखवायाचा असतो, त्यासाठी हे रेडिमेड ब्लाऊजी आपल्याला मदत करतात. सध्या सर्व वयोगटातील महिला तयार ब्लाऊज विकत घेताना दिसत आहेत. सोशल मिडियावर फोटो शेअर केले जातात, त्यामुळे इंस्टारेडी होऊन फोटोशूट करायला आवडत असल्याने तशा प्रकारचे ब्लाऊज खरेदी केले जातात, हे ब्लाऊज महाग असले तरी ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, एकदा घेतलेला ब्लाऊज कमीत कमी 3 ते 4 साड्यांवर मॅच होतो. तसेच हे डिझाइनर तयार ब्लाऊज स्कर्टवर, हाय वेस्ट पँटवरही घालता येतात. त्यात आता कपडे रिपीट करण्याचा ट्रेंड असल्याने कोणाला रिपीट करताना काहीच वाटणार नाही, तसेच फॅशन इन्फ्लुएन्सर शिकवतात की एकच कपडे वेगळ्या प्रकारे घालावेत, जेणेकरून नवीन लूक तयार होईल, असे परांजपे यांनी सांगितले.

7 हजारांपर्यंत मिळतात रेडिमेड ब्लाऊज (Blouses are available up to 7000)

तयार ब्लाऊज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बाजारात मिळत आहेत. ऑनलाईनमध्ये ब्लाऊज कमीत कमी 750 रुपयांपासून मिळतो. तर टिशर्ट पद्धतीचे किंवा लायक्रा कापडाचे ब्लाऊज हे 400 रुपयांपासून मिळतात. ऑफलाईन बाजारात कुठे ब्लाऊज खरेदीसाठी गेले आहात, त्यावर किंमत ठरेल, तर अंधेरी, बोरिवली, विलेपार्ले येथे 500 ते 600 पासून ब्लाऊंजांची किंमत सुरू होते. तर दादर, डोंबिवली, भुलेश्वर येते 200 रुपयांपासून ब्लाऊज मिळतात. ब्लाऊंजांची किंमत कितीने सुरू होते हे तर समजले, मात्र पुढे त्या ब्लाऊंजांची किंमत अगदी 7 हजारांपर्यंतही जाते. म्हणजेच काय, साड्यांच्या किंमतीलाही या रेडिमेड ब्लाऊजांच्या किंमतीने मागे टाकले आहे.

लग्नाचा सिझनसंपेपर्यंत ब्लाऊजांची चलती असेल (readymade blouse market is booming)

खास लग्नासाठी लेहेंग्यावर घालण्यासाठी किंवा साडीवर घालण्यासाठी लाल, गुलाबी, हिरव्या रंगाचे पाठीला जाळी असलेले त्यावर नवरा - नवरी किंवा डोली असे चित्र विणलेले ब्लाऊजांची विक्री या सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. चंद्रमुखी सिनेमासाठी अमृता खानविलकरने घातलेला ब्लाऊज खूप प्रसिद्ध झाला. त्यामुळे अनेक महिला त्यांचे नाव किंवा पती-पत्नीचे नाव ब्लाऊजवर विणून घेत आहेत. या दोन्ही प्रकारच्या ब्लाऊजची विक्री नोव्हेंबरपासून जानेवारी 15 तारखेपर्यंत सर्वाधिक झाली आहे. तर, यामुळे साधारण 35 लाखांचा महसूल गार्मेंटकडे जमा झाला आहे. आमच्या गार्मेंटचे ब्लाऊज डिलरमार्फत भारतभरात सगळीकडे जातात. या ब्लाऊंजामधून कमीत कमी 400 टक्के मार्जिन मिळते. मात्र ब्लाऊंजांवरील हाताने करण्याच्या कामांना थोडा वेळ लागतो, त्यासाठी माणसे अधिक लागतात, नाहीतर इतर रेडिमेड कपड्यांप्रमाणे आणखी मोठा नफा मिळला असता, असे मंडल म्हणाले.

ऑगस्टपासून ते डिसेंबरपर्यंत साधारण रेडिमेड ब्लाऊजांची विक्री 40 टक्क्यांनी वाढली आहे. तर, हा लग्नाचा सिझन संपेपर्यंत विक्रीत फारशी घट होणार नाही असा अंदाज आहे. तर, नंतर सिझननुसार सिंपल ब्लाऊज आणले जाणार आहेत. सध्या यात कपडा बाजारातील मोठ मोठे प्लेअरही उतरू लागले आहेत, अनेक फॅशन डिझाइनर तसेच आदित्या बिर्ला ग्रुप, रिलायन्स या कंपन्या या सेक्टरमध्ये येऊ पाहात आहेत, असेही मंडल यांनी सांगितले.