आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी आज 1 एप्रिल 2023 रोजी 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली. या दर कपातीनंतर मुंबईत कमर्शिअल सिलेंडरचा भाव 1980 रुपये इतका कमी झाला आहे. राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 2028 रुपयांचा दर असेल. या निर्णयाने छोट्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. ( Petroleum companies announced commercial LPG Cylinder Price cut by 91.50 rupees)
पेट्रोलियम कंपन्यांनी मार्च महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत 350 रुपयांची वाढ केली होती. घरगुती गॅस देखील 50 रुपयांनी महागला होता. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमर्शिअल सिलेंडरचा भाव 92 रुपयांनी कमी करण्यात आला आहे.आजच्या दर कपातीनंतर दिल्लीत कमर्शिअल सिलेंडरचा दर 2028 रुपये इतका कमी झाला. मुंबईत तो 1980 रुपये आणि कोलकात्यात 2132 रुपये इतका आहे. चेन्नईत 19 किलोच्या सिलिंडरसाठी 2192.50 रुपये इतका दर असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमर्शिअल सिलेंडर जवळपास 225 रुपयांनी स्वस्त आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरु झाल्यानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात क्रू़डचा भाव वधारला होता. क्रूडचा दर 140 डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेला होता. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती. मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ दर स्थिर असला तर पेट्रोलियम कंपन्यांकडून एलपीजी सिंलेंडरच्या किंमतींमध्ये वर्षभर बदल केले. वर्ष 2022 मध्ये कमर्शिअल सिलेंडरचा भाव चार वेळा वाढवला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅसच्या किंमतींचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाहीर केले जातात.पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी या इंधनाचे किरकोळ विक्रीचे दर जागतिक बाजारातील क्रू़डच्या किंमतींशी संलग्न आहेत.दररोज सकाळी सहा वाजता कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची घोषणा केली जाते.
घरगुती एलपीजी सिलेंडरचा भाव जैसे थे
पेट्रोलिय कंपन्यांनी आज शनिवारी 1 एप्रिल 2023 रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडचा भाव जैसे थेच ठेवला. मुंबईत घरगुती सिलेंडरचा भाव 1102.50 रुपये इतका आहे. दिल्लीत 1103 रुपये असून कोलकात्यात तो 1129 रुपये इतका आहे. चेन्नईत घरगुती सिलेंडरचा भाव 1118.50 रुपये इतका आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा भाव
आज एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झाला नाही. मागील 10 महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलचा दर 94.27 रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये असून डिझेल 89.62 रुपये इतके आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव 106.03 रुपये असून डिझेलचा दर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.63 आणि डिझेलचा दर 94.24 रुपये इतका आहे.आजपासून पंजाब आणि केरळमध्ये पेट्रोल आणि डिझेल महगाल आहे. पंजाब आणि केरळ सरकारने इंधनावर सेस लागू केल्यामुळे या राज्यांत इंधन 2 रुपयांनी महागले.