सिटी बॅंकेचा भारतातील बॅंक ग्राहकांचा व्यवसाय बुधवारपासून (दि. 1 मार्च, 2023) ॲक्सिस बॅंकेच्या नियंत्रणाखाली आला आहे. सिटी बॅंकेने मागील वर्षा जाहीर केल्याप्रमाणे भारतातील बॅंक ग्राहकांचा व्यवसाय ॲक्सिस बॅंकेकडे ट्रान्सफर करण्यास सुरूवात केली होती. ती आजपासून पूर्ण झाली असून, सिटी बॅंकेचे ग्राहक आता अधिकृतरीत्या ॲक्सिस बॅंकेचे ग्राहक झाले आहेत. ते आता ॲक्सिसच्या सर्व सोयीसुविधांचा वापर करू शकतात.
सिटी बॅंकेच्या ग्राहकांवर या बदलांचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण सिटी बॅंकेकडे क्रेडिट कार्ड, होम लोन, पर्सनल लोन, रिटेल बॅंकिंग आणि इन्शुरन्ससहित अनेक प्रोडक्टसच्या निमित्ताने सिटी बॅंकेशी जोडलेले आहेत. तसेच सिटी बॅंकेची कामाची पद्धत आणि ॲक्सिस बॅंकेकडून मिळणाऱ्या सेवा यामध्येही फरक पडू शकतो. सिटी बॅंक ही ग्लोबल बॅंक म्हणून ओळखली जाते. उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय याचे ग्राहक आहेत.
Table of contents [Show]
सिटी बॅंकेने 13 देशांमधील सेवा केली बंद
सिटी ग्रुपने 1 वर्षापूर्वी आपल्या जागतिक पातळीवरील व्यावसायामध्ये बदल करण्याचे सुतोवाच दिले होते. त्यानुसार सिटी बॅंकेने 2021 मध्ये भारतासह 13 देशांमधील रिटेल बॅंकिंग ऑपरेशन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिटी बॅंकेने भारतातील सेवा बंद करून त्या ॲक्सिस बॅंकेकडे ट्रान्सफर केल्या आहेत. तसेच सिटी बॅंकेने ग्राहकांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून FAQ प्रसिद्ध केली.
सिटी बॅंकेतील खाते ॲक्सिस बॅंकेत ट्रान्सफर झाल्यानंतर त्या खात्याची माहिती पहिल्याप्रमाणेच राहील का?
होय, सिटी बॅंकेच्या खात्याचा वापर पूर्वीप्रमाणेच करता येईल. बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी /एमआयसीआर कोड, डेबिट कार्ड, चेक बुक, फी आणि इतर चार्जेस यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. भविष्यात यात जर काही बदल झाले तर ते ॲक्सिस बॅंकेद्वारे ग्राहकांना कळवले जाईल.
1 मार्च, 2023 पासून ॲक्सिस बॅकेच्या एटीएम कार्डचा वापर करता येईल का?
होय, सिटी बॅंकेचे ग्राहक आजपासून म्हणजे 1 मार्च, 2023 पासून ॲक्सिस बॅंकेच्या एटीएमचा वापर करू शकतात. सिटी बॅंकेच्या ग्राहकांना जितके ट्रान्सॅक्शन फ्री होते. तेवढेट ट्रान्सॅक्शन ॲक्सिस बॅंकेमध्ये लागू होतील. त्याव्यतिरिक्त जास्तीचे व्यवहार केले तर ग्राहकाला त्याचे शुल्क भरावे लागेल.
सिटी बॅंकेसोबत म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि इतर प्रोडक्टमध्ये गुंतवणूक केली आहे?
1 मार्च, 2023 पासून म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि इतर प्रोडक्टमध्ये केलेली गुंतवणूक ही ॲक्सिस बॅंकेमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ॲक्सिस बॅंकेच्या शाखेमध्ये जाऊन या सेवांचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.