भारतात संपत्तीचे विवाद काही नवीन नाही. संपत्तीच्या वादावरून एकमेकांचे जीव घ्यायला देखील लोक मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांनी वेळीच संपत्तीचे वाटप केले तर त्यांच्या मृत्यनंतर होणारे संभाव्य वाद टाळता येऊ शकतात. भारतात कायद्यानुसार असे संपत्तीचे वाटप किंवा हस्तांतरण करता येते. यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
तुम्ही देखील संपत्तीच्या हस्तांतरणाबाबद विचार करत असाल आणि त्यासाठी कायदेशीर मार्ग जाणून घ्यायचा असेल तर हा लेख वाचाच. संपत्तीचे वाद टाळण्यासाठी तुम्हांला याचा उपयोग होऊ शकतो. हिंदू कुटुंबपद्धतीत संपत्ती पालकांकडून मुलांकडे हस्तांतरित होत असते. कायदेशीर वारस असलेल्यांना देखील संपत्तीत वाटा मिळू शकतो. रक्ताच्या नात्यातील लोकच ‘कायदेशीर वारस’ असतात असे नाही, हे देखील लक्षात घ्या. कायदेशीर प्रक्रियेतून संपत्तीचा मालक ज्याला वारसदार ठरवेल तो कुणीही व्यक्ती संपत्तीवर दावा करू शकतो. त्यामुळे भविष्यातील वाद-विवाद टाळण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब तुम्ही करू शकता.
नामांकनाद्वारे मालमत्ता हस्तांतरण
संपत्तीचे मालक असलेली व्यक्ती नॉमिनेशनद्वारे संपत्तीचे हस्तांतरण करू शकते. याचाच अर्थ कोणती जमीन कुणाला, कोणते घर कुणाला हे ठरविण्याचा अधिकार मालकाला असतो. पालक त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार विभाजित करू शकतात. नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला संपत्तीच्या मालकाच्या मृत्युनंतर त्या संपत्तीचा ताबा मिळू शकतो. ही एक सर्वसामान्य पद्धत असून, आधीच या सर्व गोष्टी करून ठेवल्यास भविष्यात अडचणी येणार नाहीत.
इच्छापत्राद्वारे विभाजन
पालक देखील त्यांची मालमत्ता मुलांमध्ये वाटण्यासाठी इच्छापत्र करू शकतात. मृत्युपत्रात त्यांना या मालमत्तेतील वाटा कोणाला द्यायचा आहे, हे सांगण्याची सुविधाही मिळते. भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 नुसार, मृत्युपत्र हा कायदेशीररित्या वैध दस्तऐवज आहे. रक्ताच्या नातेवाईकांशिवाय कुणाही व्यक्तीला संपत्तीचा उत्तराधिकारी म्हणून नेमण्याची व्यवस्था इच्छापत्राद्वारे करता येते. याला वैधानिक मान्यता असल्यामुळे मालमत्तेचे मालक याबाबत त्यांच्या मृत्यूपूर्वीच निर्णय घेऊ शकतात आणि संभाव्य संपत्तीचे वाद टाळू शकतात.
कायदेशीर प्रक्रिया महत्वाची
तसेही संपत्तीचे वाद हे किचकट आणि वेळखाऊ असतात. त्यामुळे वेळीच संपत्तीचे विभाजन करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुमच्याकडे संबंधित मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संपत्तीचे नामांकन करण्यासाठी आणि इच्छापत्रासाठी कायदेशीर मदत घ्यावी लागते. वकिलांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. संपत्ती हस्तांतरणासाठी या पर्यायांचा विचार केल्यास तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचू शकेल.