चीनची (China) झिरो कोव्हिड (Zero Covid Policy) रणनिती सध्या देशातच वादात सापडली आहे. झिरो कोव्हिड म्हणजे कोव्हिडचा (Covid 19) एक जरी रुग्ण आढळला तरी त्या प्रांतामध्ये संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात येतो. पण, त्यामुळे पुन्हा एकदा सगळे आर्थिक व्यवहार थांबतात. आणि लोकांचं तसंच अर्थव्यवस्थेचं आर्थिक नुकसान होतं.
झिरो कोव्हिड रणनितीविरोधात अलीकडे तिथल्या लोकांनीही आंदोलनं केली. तर जागतिक स्तरावर चीनची पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली. तसंच अॅपल (Apple Inc) सारख्या कंपन्यांनी चीनमध्ये होणारी त्यांच्या उत्पादनाची निर्मिती कमी केली किंवा थांबवली. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे.
हे जरी खरं असलं तरी चीनमध्येच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. आणि तो असं सांगतो की, चीनने झिरो कोव्हिड (China Zero Covid) रणनिती मागे घेतली तर 13 ते 21 लाख लोकांचा जीव जाईल. हा अहवाल लंडनमधल्या ग्लोबल हेल्थ इंटलिजन्स कंपनीने दिला आहे. हा आकडा जाहीर करताना संस्थेनं चीनमधून किंवा चीनमध्ये होणारा परदेशी प्रवासही गृहित धरला आहे. त्यामुळे हा अहवाल जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातोय.
चीनमध्ये विकसित झालेल्या कोरोना लशींची परिणामकारकता कमी असल्यामुळे आणि कोरोना व्हायरसच्या सतत बदलणाऱ्या व्हेरियंट्समुळे ही वेळ आली आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
‘चीनमध्ये बऱ्याच भागात लोकांमध्ये कोरोनासाठीची रोगप्रतिकारक शक्ती तयारच होऊ शकली नाही. चीनमध्ये बनलेल्या लशी लोकांना देण्यात आल्या. या लशींमध्ये कोरोनापासून बचावाची शक्ती कमी आहे.’ असं या अहवालात म्हटलंय.
शिवाय नवीन व्हेरियंट्समुळे लोकांमध्ये कोरोना विषाणूची एकदा लागण झाल्यावर तयार होणारी रोगप्रतिकारक शक्तीही कमी पडतेय. हे पाहता जर हाँग काँगमध्ये डिसेंबर महिन्यात झालेला कोरोना उद्रेक पुन्हा चीनमध्ये दिसला तर चीनच्या आरोग्य व्यवस्थेला त्याचा सामना करणं कठीण जाईल. कारण, चीनमध्ये अशा उद्रेकात 1670 ते 2790 लाख नवीन कोरोना रुग्ण पुन्हा दिसू लागतील.
आणि ही परिस्थिती फक्त चीनसाठी नाही तर जगासाठीही धोकादायक असणारए. कारण चीनबरोबरचे व्यवहार सुरूच राहिले तर जगालाही धोका असणार आहे.