Apple MacBook Production in Vietnam: ॲपल कंपनी 2023च्या मध्यापासून व्हिएतनाममधून मॅकबुकचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. ॲपल कंपनी वेगवेगळ्या कारणांमुळे चीनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे. याचबरोबर कंपनीने चीनमधून बाहेर पडताना भारतासहित इतर देशांमध्ये उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे चीन चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.
इतर देशांमध्ये होणार मॅकबुकचे उत्पादन!
निक्केई अशियाच्या रिपोर्टनुसार, ॲपलने आपली पुरवठादार कंपनी फॉक्सकॉनला दक्षिण पूर्व आशियामधील देशांमध्ये मॅकबुकचे उत्पादन सुरू करता येईल का? याची चाचपणी करण्यास सुरूवात केली. ॲपलने मागील अनुभव लक्षात घेता, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यास कंपनीच्या प्रोडक्शनवर त्याचा काही परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कंपनीने महत्त्वाचे प्रोडक्टस चीनमधून बाहेर नेण्याचा विचार केला. ज्याची सुरूवात व्हिएतनामपासून होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अमेरिका आणि चीन या देशांमधील वाढती स्पर्धा आणि राजकीय तणावांपासून दूर राहण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे निक्केई अशियाच्या रिपोर्टमध्ये म्हटले. तर काऊंटरपॉईं रिसर्चच्या रिपोर्टमध्ये, फॉक्सकॉन भारत, व्हिएतनाम आणि ब्राझील या देशांमध्ये किमान 30 टक्के प्रोडक्शन सुरू करू शकते, असे म्हटले आहे. यामुळे येत्या काळात मोबाईल प्रोडक्शन क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी निर्माण होणार आहे.
ॲपलची तैवानवरील निर्भरता कमी करण्याची योजना!
यापूर्वी द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, फॉक्सकॉनच्या माध्यमातून कंपनी तैवानमधून येणाऱ्या सुट्या भागांच्या निर्यात कमी करण्याचा विचार करत आहे. त्याऐवजी कंपनी आशियामधील विशेषत: भारत, व्हिएतनाम आणि ब्राझीलसारख्या देशांमधील उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एका अहवालानुसार, भारतातील आयफोन मॅन्युफॅक्च रिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2019 मध्ये त्याचे प्रमाण 50 टक्के होते ते 2021 मध्ये 73 टक्के झाले होते. याच दरम्यान भारतात आयात केल्या जाणाऱ्या आयफोनच्या टक्केवारीतही घट होऊ लागली आहे. येत्या काही वर्षात भारत आयफोनचे किमान 40 ते 45 टक्के उत्पादन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतात या क्षेत्रात नोकरीची चांगली संधी निर्माण होणार आहे.