भारतातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री संपत्तीच्या दृष्टीने कोट्यधीश असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. कोट्यधीश मुख्यमंत्र्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी अव्वल स्थानी असून त्यांची एकूण संपत्ती 510 कोटी इतकी आहे.
असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि इलेक्शन वॉच या संस्थांनी भारतातील विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा आढावा घेतला. विद्यमान 30 मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला शपथपत्रातील संपत्तीचा तपशीलाचा आढावा घऊन अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जगन मोहन रेड्डी यांची एकूण संपत्ती 510 कोटी असून ते अव्वल स्थानावर आहेत.
दिल्ली आणि पॉंडेचरीचे दोन मुख्यमंत्री आणि 28 राज्यांचे मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत एडीआरने एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओदिशा या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत प्रचंड संपत्ती आहे. जगन मोहन रेड्डींनंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे 163 कोटींची संपत्ती आहे. ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
तिसऱ्या स्थानावर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक असून त्यांच्याकडे एकूण 63 कोटींची संपत्ती आहे. एडीआरच्या अहवालानुसार 30 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा विचार करता 29 मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. त्यांची सरासरी संपत्ती 33.96 कोटी इतकी आहे.सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आहेत. बॅनर्जी यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्याशिवाय केरळचे पी. विजयन यांची संपत्ती 1 कोटी रुपये असून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची संपत्ती 1 कोटी इकी आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी 3 कोटींची संपत्ती असल्याचे ए़डीआर संस्थेने म्हटले आहे.
भारतातील 13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्हे
एडीआरच्या अहवालानुसार 30 पैकी 13 मुख्यमंत्र्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. या 13 मुख्यमंत्र्यांवर जीवे मारणे, अपहरण करणे अशा स्वरुपाचे गंभीर फौजदारी गुन्हे असल्याचे अहवालात म्हटले आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी पाच वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.