सोशल मीडियावर सध्या शंखाकृती एका इमारतीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हे आहे कोलकात्यातलं नवं धनाधान्यो ऑडिटोरिअम. अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते पोयला बैसाख या बंगाली नववर्ष दिनाचं औचित्य साधून या ऑडिटोरिअमचं उद्घाटन करण्यात आलं. तेव्हापासून काही फोटो सोशल मीडियावर फिरायला लागले.
ऑडिटोरिअमच्याया शंखरूपी रचनेमुळे सभागृहाचं वेगळेपण अधोरेखित झालं आहे. आणि या ऑडिटोरिअममधल्या सुविधा जगात सर्वोत्तम असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. आपणही या ऑडिटोरिअमचा आतून फेरफटका मारूया. आणि जाणून घेऊया देशातल्या एका आधुनिक कलाकेंद्राची वैशिष्ट्यं.
धनाधान्यो सभागृह हे कला-सांस्कृतिक केंद्र असून कोलकात्यातील अलीपुरा येथे हे सभागृह उभारलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, धनाधान्यो सभागृह हे राज्याच्या उन्नतीचं विकासाचं प्रतीक आहे. हे शंखरूपी आकारातील सभागृह ममता बॅनर्जी यांचं स्वप्न होतं आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष अभिनंदन केलं आहे.
हे सहा मजली सभागृह उभारण्यासाठी जवळपास 7 वर्ष लागले. 600 फूट उंचीचं हे सभागृह उभारण्यासाठी 600 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. असं हे भव्य-दिव्य सभागृहाच्या उभारणीसाठी 440 कोटी रूपयाचा एकूण खर्च झाला आहे.
या सभागृहामध्ये दोन हॉल आहेत. एका हॉलमध्ये 2000 व्यक्तींची आसनव्यवस्था आहे तर दुसऱ्या हॉलमध्ये 450 व्यक्ती बसू शकतात. तर 300 लोकांच्या क्षमतेचं ओपन थिएटर सुद्धा आहे. यासोबतच मल्टीपर्पज हॉल, फुड कोर्ट आणि पार्किंगची सुद्धा सुविधा आहे.
सूरतमधल्या महागड्या दगडाने उभारलेल्या या सभागृहाचं स्ट्रक्चर हे झींकचं कोटिंग असलेल्या लोखंडाने बनवलं आहे आणि हे सगळं लोखंड खास जर्मनीवरून मागवलं आहे. तर या सभागृहाच्या रोषणाईसाठी वापरलेले लाईट्स जपानहून आणले आहेत.