स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. घर घेण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहकर्ज (Home Loan). आजकाल गृहकर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांचं हे स्वप्नही पूर्ण होताना दिसत आहे. मात्र गृहकर्ज घेताना ईएमआय (Equated Monthly Installment) ही एक गुंतवणूकच आहे आणि त्यासाठी खर्चही आहे. अशा परिस्थितीत ईएमआयच्या रुपात खर्च होणारा प्रत्येक रुपया महत्त्वाचा आहे. अनेकवेळा तुम्हाला स्वस्त होम लोन ईएमआयसाठी अनेक ऑफरही दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्वस्त ईएमआयच्या नावावर तुम्ही गृहकर्जावर 133 टक्के जास्त व्याज (Interest) तर देत नाहीत ना, हे तपासून पाहा.
व्याजाचा खेळ
स्वस्त ईएमआयसाठी बँका अनेकवेळा लोकांना 30 किंवा 40 वर्षांच्या मुदतीसारख्या दीर्घ मुदतीचं गृहकर्ज देतात. आदर्श परिस्थितीत कर्जाचा कालावधी 15 ते 20 वर्षांचा असायला हवा. 40 वर्षांच्या मुदतीचा पर्याय तुम्ही निवडला तर कर्जाचा ईएमआय नक्कीच कमी असणार आहे मात्र यामध्ये व्याजाचा खेळ जोरदार असणार आहे.
दीर्घकालीन कर्जाचं गणित
समजा तुम्ही 40 वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेणार असाल तर तुम्हाला प्रति लाख 750 रुपये ईएमआ भरावा लागेल. तुम्हाला हा ईएमआय वार्षिक 8.6 टक्के सामान्य व्याजदरानं द्यावा लागणार आहे. त्याच व्याजावर तुम्ही 30 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतलं, तर तुमचा ईएमआय 5 टक्के जास्त असेल, म्हणजेच तो प्रति लाख 800 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
कर्जाचा हिशोब कसा?
घर खरेदी करण्यासाठी तुम्ही 50 लाखांचे कर्ज घेतले आहे, असं गृहीत धरू. यावरचा व्याजदर केवळ 8.6 टक्के आहे. आता तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जाचा ईएमआय किती भरावा लागेल आणि व्याज किती असेल, ते पाहू…
- 15 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेलं कर्ज: वर नमूद केलेल्या रकमेनुसार आणि व्याजानुसार, तुमचा दरमहा ईएमआय 49,531 रुपये असणार आहे. म्हणजेच, 15 वर्षांमध्ये रकमेव्यतिरिक्त, तुम्ही गृहकर्जाचे 39,15,491 रुपये व्याज द्याल.
- 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेलं कर्ज: या कर्जाचा कालावधी 20 वर्षे करू. या प्रकरणात, तुमचा ईएमआय 43,708 रुपयांवर येईल आणि एकूण व्याजाची रक्कम 54,89,953 रुपये असणार आहे.
- 30 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेलं कर्ज: जेव्हा तुम्ही 30 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांचं कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला मासिक ईएमआय म्हणून 38,801 रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र व्याजदेखील 89,68,211 रुपये असणार आहे.
- 40 वर्षांच्या कर्जावरचं व्याज: या हिशोबानुसार, तुम्ही 40 वर्षांसाठी कर्ज घेतलं तर तुमचा ईएमआय 37,036 रुपये आहे. परंतु या काळात कर्जावरचं एकूण व्याज 1,27,77,052 रुपये होतं.
या परिस्थितीत त्याच कर्जावरचं तुमचं व्याज 20 वर्षांच्या तुलनेत 40 वर्षांत 133 टक्क्यांनी वाढलं आहे.