सध्या अनेक इमारतींवर सोलर पॅनेल पाहायला मिळते. बहुतांश बैठ्या घरांच्या छतावर देखील सोलर पॅनेल लावण्याचे प्रमाण वाढले आहे. सोलर पॅनेलमुळे दरमहिन्याला वीज बिलावर खर्च होणारे हजारो रुपये खर्च वाचतात. तुम्ही देखील घरावर सोलर पॅनेल लावण्याचा विचार करत असाल तर एसबीआयच्या कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता.
Table of contents [Show]
सोलर पॅनेलसाठी एसबीआयची कर्ज योजना
सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या एसबीआयद्वारे सोलर पॅनेलसाठी कर्ज दिले जाते. एसबीआयने काही दिवसांपूर्वीच सोलर पॅनेलचा गृहकर्जामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या निर्णयानुसार, जे ग्राहक ग्रीन फंडिंग अंतर्गत गृहकर्ज घेतील, त्यांना सोलर पॅनेलच्या खर्चाचा देखील समावेश करावा लागेल. थोडक्यात, या अंतर्गत जे बिल्डर्स घराची निर्मिती करतील; त्यांना घराचे छतावर सोलर पॅनेल बसवणे अनिवार्य असेल. याचा विशेष फायदा बँकेकडून कर्ज घेऊन घर खरेदी करणाऱ्यांना होईल.
एसबीआयकडून थेट सोलर पॅनेलसाठी घेऊ शकता कर्ज
एसबीआयच्या या कर्जाचा उद्देश ग्राहकांना सोलर पॅनेल बसवण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. ग्राहकांना सोलर पॅनेलसाठी 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जदाराने कमीत कमी 20 टक्के रक्कम स्वतः गुंतवणे अपेक्षित आहे. सध्या सोलर पॅनेलसाठी घेतलेल्या कर्जावर बँकेकडून 10.25 टक्के व्याज आकारले जाते. या कर्जाचा कालावधी 6 महिने ते 5 वर्षापर्यंत आहे. याशिवाय, कर्ज काढताना प्रोसेसिंग फी देखील आकारली जाते.
कर्ज काढण्यासाठी पात्रता
बँकेत सॅलरी अकाउंट असलेले सर्व खातेदार या योजनेसाठी पात्र आहेत. कर्जदाराचा सिबिल स्कोर हा 670 पेक्षा अधिक असावा. तसेच, वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. यासाठी तारण हे बँकेच्या कर्जातून घेतलेले सोलर पॅनेलच असतात.
कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- सोलर पॅनेल व इतर उपकरणं बसण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे कोटेशन
- मागील 6 महिन्याचे सॅलरी स्टेटमेंट
- मागील 6 महिन्याचे वीज बिल
- केवायसी कागदपत्रे
- मागील दोन वर्षांचे आयटीआर रिटर्न्स
इतर बँकाही देतात सोलर पॅनेल बसवण्यासाठी कर्ज
एसबीआयसोबतच, यूनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्रासह इतर बँका देखील घरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी कर्ज देतात. याशिवाय, तुम्ही सरकारी सबसीडीचा देखील फायदा घेऊ शकता. सरकारी सबसीडीचा फायदा घेण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.