वाढत्या महागाईने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने GST अंमलबजावणीच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीयांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरील वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. या घोषणे सोबत सरकारने वस्तूंची यादीदेखील जारी केली आहे.
31.3 टक्के वरून कपात-
यापूर्वी ग्राहकांना स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूं खरेदी करताना 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये अनेक गृहोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.
'या' वस्तू झाल्या स्वस्त-
या निर्णयानुसार आता ग्राहकांना 27 इंचापर्यंतचे एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, गिझर, पंखे, कुलर आणि मिक्सर, ज्युसर तसेच व्हॅक्यूम क्लीनर यांसारखी इलेक्ट्रिकल उपकरणे खरेदी करताना 31.3 टक्के GST आकारला जात होता. मात्र, या सर्व वस्तूंवरील जीएसटी दर 18 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच मोबाईल फोनवरील जीएसटी दरही 31.3 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमतीमध्येही मोठी घट पाहायला मिळणार आहे.
इतर घरगुती उपकरणांमध्ये, एलपीजी स्टोव्हचा जीएसटी दर 21 टक्क्यांवरून 18 टक्के, एलईडीचा दर 15 टक्क्यांवरून 12 टक्के, शिलाई मशीनचा दर 16 टक्क्यांवरून 12 टक्के, स्टेटिक कन्व्हर्टरचा दर 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. कंदीलावरील जीएसटी 8 टक्क्यांवरून 5 टक्के आणि व्हॅक्यूम फ्लास्क आणि इतर व्हॅक्यूम वेसल्स उपकरणांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
शालेय वस्तूंसह वैद्यकीय उपकरणांवर सूट
याच बरोबर काही शालेय वस्तू, वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक वस्तू , कॅन्सरवरील औषधे, यासह वैयक्तिक वापरासाठी आयात करण्यात येणाऱ्या औषधे यावरील जीएसटीमध्येही कपात करण्यात आली आहे.