टोमॅटोमधील महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. टोमॅटोचे दर कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गुरुवार 20 जुलै 2023 पासून टोमॅटोची 70 रुपये किलो दराने विक्री करण्याचे निर्देश केंद्र सरकारने NCCF आणि NAFED (नाफेड) यांना दिले आहेत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने NCCF आणि नाफेडला टोमॅटोची किरकोळ बाजारात 70 रुपये किलोने विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा टोमॅटोच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकार NCCF आणि नाफेड या संस्थांच्या माध्यमातून टोमॅटोची खरेदी करत आहे. या दोन्ही संस्थांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून टोमॅटो खरेदी वाढवली आहे. मागील आठवडाभरापासून या दोन्ही संस्थांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटोची घाऊक खरेदी सुरु केली आहे.
दोन्ही संस्थांनी सुरुवातीला 90 रुपये किलोने सरकारने टोमॅटो खरेदी केले होते. त्यानंतर 16 जुलै 2023 पासून सरकारने NCCF आणि नाफेडकडून 80 रुपये किलोने टोमॅटो खरेदी केले होते. या संस्थांनी खरेदी केलेला टोमॅटो सरकारच्या विशेष विक्री केंद्रावर विक्री केला जात आहे.
दिल्ली NCRमध्ये 14 जुलै ते 18 जुलै 2023 या दरम्यान 391 मेट्रिक टन टोमॅटोचा पुरवठा NCCF आणि नाफेड या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा टोमॅटो दिल्ली आणि परिसर, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख मंडईंमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. यामुळे येथील किरकोळ बाजारातील टोमॅटोचे भाव काही प्रमाणत कमी झाले होते.
आता गुरुवार 20 जुलै 2023 पासून याच मंडईंमध्ये 70 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. ज्यामुळे इथल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांना कधी मिळणार स्वस्त टोमॅटो?
टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असले तर मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला त्याचा फायदा झालेला नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख भाजीपाला मंडईत अजूनही टोमॅटोचा भाव प्रति किलो 130 ते 140 रुपयांच्या दरम्यान आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने किमान लक्ष देण्याची मागणी सामान्य मुंबईकरांनी केली आहे.