केंद्र सरकारने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. सरकारने आता तूर आणि उडीद दाळींच्या साठा मर्यादित ठेवण्याच्या मूदतीमध्ये दोन महिन्यांची वाढ केली आहे. त्यानुसार आता व्यापारी व्यावसायिकांना 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित स्टॉक ठेवावा लागणार आहे. परिणामी दसरा दिवाळी होईपर्यंत डाळीच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे.
30 ऑक्टोबरपर्यंत होती मूदत
केंद्र सरकारने यापूर्वी घाऊक व ठोक विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांना डाळीचा साठा मर्यादित ठेवण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मूदत दिली होती. मात्र, यंदा डाळीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज पाहता ऐन सणासुदीत डाळीचे भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच डाळीचा साठा नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आता आणखी दोन महिन्याची वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात सोमवारी सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
50 मेट्रिक टनापर्यंत साठा
सरकारच्या अधिसूचनेनुसार, व्यापारी घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी डाळीचा साठा करण्याची मर्यादा ही 200 मेट्रिक टनावरून 50 मेट्रिक टन इतकी कमी करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी आता तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याची मर्यादा 50 मेट्रिक टन असेल; तर किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 मेट्रिक टनपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे. डाळ मिस वाल्यांसाठी वार्षिक डाळ उत्पादनाच्या शेवटच्या 1 महिन्यातील उत्पादन किंवा एकूण उत्पादनाच्या एकूण 10 टक्के, यापैकी जे जास्त असेल तितका साठा ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डाळीच्या साठ्याची मर्यादा कायम ठेवली आहे. बाजारातील साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना बाजारात पुरेशा प्रमाणात तूर आणि उडीद दाळ परवडणाऱ् दरात उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.