सध्या फसव्या गुंतवणूक योजनांनाच सुळसुळाट पहायला मिळतो आहे. सोशल मिडीयावर तर असे काही ‘फिनफ्लुएंसर्स’ (Finfluencers) आहेत ज्यांना गुंतवणुकीचा कुठलाही अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता नसताही ते सामान्य नागरिकांना वेगवगेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना पहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचे विधान केले आहे. रविवारी बेंगळूरू येथे थिंकर्स फोरमच्या एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या सोशल मिडीयावर गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या ‘फिनफ्लुएंसर्स’साठी कुठलेही सरकारी नियम आणि कायदे नाहीत. त्याबाबत सरकारकडे सध्या कुठलाही प्रस्तावही नाही. परंतु येणाऱ्या काळात यावर सरकार महत्वाचे पाऊल उचलणार आहे असे संकेत त्यांनी दिले.
सध्या वेगवेगळे पॉन्झी ॲप्स कार्यरत असून तेथून गुंतवणूकदारांना आमिषे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. या सगळ्या गोष्टी कायद्याला धरून नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. या पॉन्झी ॲप्सची पडताळणी, विश्वासार्हता तपासून घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली असून येणाऱ्या काळात त्यावर सरकारी स्तरावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे. फसव्या गुंतवणूक योजना सामान्य नागरिकांनी ओळखायला हव्यात आणि योग्य ठिकाणी आपले पैसे गुंतवले पाहिजेत असा सल्ला देखील त्यांनी दिला.
If there are 3-4 people giving us objective advice, there are 7 others out of 10 who're probably driven by some other considerations. There're many ponzi apps on which we're working with concerned ministry & RBI & clamping down on them like never before.
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) April 23, 2023
- Smt @nsitharaman(1/2) pic.twitter.com/9ibaHSP6ek
आरबीआय आणि आयटी मंत्रालयाची नजर
याबाबत अधिक माहिती देताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सध्या सोशल मिडीयावर ‘फिनफ्लुएंसर्स’ (Finfluencers) मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांच्यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय लक्ष ठेऊन आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. या फिनफ्लुएंसर्सद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीची, कंपन्यांची देखील माहिती घेतली जात आहे. 10 पैकी 9 गुंतवणुकीमध्ये सामान्य गुंतवणूकदरांचे नुकसान झालेले पहायला मिळाले आहे असे देखील त्या म्हणाल्या. या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आरबीआय आणि आयटी मंत्रालय सतर्क झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेबीचा अहवाल
SEBI ने प्रकाशित केलेल्या एका अहवालात 2018-19 आणि 2021-2022 या आर्थिक वर्षांमध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन मार्केटमधील किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये 500% वाढ पाहायला मिळाली आहे अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यापैकी बरेच गुंतवणुकदार फिनफ्लुएंसर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत असे आढळले आहे. सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होता कामा नये अशी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही सरकारी पातळीवर याबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत असे त्या म्हणाल्या.
पॉन्झी योजना म्हणजे नेमके काय?
पॉन्झी योजना म्हणजे फसवी गुंतवणूक योजना होय. चार्ल्स पॉन्झी नावाच्या एका व्यावसायिकाने 1920 च्या दशकात अमेरिकेत एक आर्थिक घोटाळा केला होता. चढ्या दराने परतावा देणारी एक गुंतवणूक योजना मार्केटमध्ये आणून सामान्य नागरिकांना त्याने फसवले होते. चढ्या दराने परतावा मिळवण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे बुडाले, त्यानंतर अशाप्रकारच्या फसव्या गुंतवणूक योजनेला ‘पॉन्झी योजना’ म्हणून ओळखले जाऊ लागले.पॉन्झी योजनेत कमी कालावधीत परताव्याच्या उच्च दरामुळे गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित होतात, मात्र शेवटी त्यांना नुकसान सहन करावे लागते.