आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याकडे घर आणि स्वतःची कार असावी. घर खरेदी करणे ही सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. मात्र कार खरेदी करणे, आता वाटते तेवढे अवघड राहिले नाही. हल्ली बँका कार खरेदी करण्यासाठी वाहन कर्जाची सुविधा (Vehicle Loan) उपलब्ध करून देतात. या कर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या हक्काच्या गाडीचे स्वप्न साकार करतात.
ज्या लोकांनी वाहन कर्जाच्या मदतीने कार खरेदी केली आहे, त्यांना मासिक हप्ता म्हणजेच ईएमआयच्या (EMI) स्वरूपात ठराविक रक्कम बँकेला परत करावी लागते. आपण अनेकदा असे पाहिले आहे की, वाहन कर्जाचा हप्ता बुडवल्याने बँकेचा एजंट कारची रिकव्हरी करतो. परंतू असे किती हप्ते चुकले की, बँक एजंट मार्फत कारची रिकव्हरी करते? पहिलाच हप्ता बुडल्यानंतर बँकेच्या कारवाईला सामोर जावे लागते का? याबाबत आज आपण माहिती जाणून घेऊयात.
कारची रिकव्हरी कधी केली जाते?
तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे नसतील, तर तुम्ही बँकेकडून वाहन कर्ज (Vehicle Loan) घेऊ शकता. 20% डाऊन पेमेंट करून तुम्ही उर्वरित 80% रकमेचे वाहन कर्ज घेऊ शकता. प्रत्येक बँकेच्या वाहन कर्जाचा व्याजदर हा वेगवेगळा असतो. सर्वसाधारणपणे किमान 8% ते कमाल 12 टक्क्यांपर्यंत वाहन कर्जाचा व्याजदर आहे.
आपण अनेकदा वाहन कर्जाचा हप्ता बुडवल्यामुळे बँकेचा एजंट कारची रिकव्हरी करत असल्याचे पाहिले आहे. मात्र ही रिकव्हरी पहिलाच हप्ता (EMI) बुडवल्यावर होत नाही.
कर्जदार मासिक स्वरूपात ठराविक रकमेचा हप्ता बँकेला परत करतो. पहिल्यांदा हप्ता चुकल्यावर बँक कर्जदाराला कॉल करते. या कॉलच्या माध्यमातून ती कर्जदाराला हप्ता चुकल्याची जाणीव करून देते. अशावेळी कर्जदार ठराविक रक्कम दंड स्वरूपात भरून कर्जाचा हप्ता भरू शकतो.
तर दुसऱ्यांदा हप्ता चुकला, तर बँक कर्जदाराला हप्ता चुकल्याच्या संदर्भात नोटीस पाठवते. त्यासोबतच बँकेचा प्रतिनिधी कर्जदाराची वैयक्तिक भेट घेऊन त्याला वेळेत कर्ज फेडण्याची विनंती करतो. या भेटीऐवजी बऱ्याच वेळा फोनवरून संपर्क केला जातो.
मात्र तिसऱ्यांदा कर्जाचा हप्ता बुडवल्यावर, बँक नोटिशीसोबत लोन डॉक्युमेंटमध्ये गॅरेंटर म्हणून असणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून याबद्दलची माहिती देते आणि कर्जाचा हप्ता भरण्यासाठी विनंती करते.
बँकेचे हप्ते सलग 3 महिने कर्जदाराने भरले नाहीत, तर वरील प्रक्रिया केली जाते. त्यासोबत कर्जदाराला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर बँक रिकव्हरी एजंटला कर्जदाराच्या घरी पाठवते आणि कर्जदाराकडून पैसे वसूल करते. जर कर्जदार थकीत रकमेची परतफेड करण्यास सक्षम नसेल, तर रिकव्हरी एजंट नाईलाजास्तव कारची रिकव्हरी करतो.
हप्ता भरण्यास सक्षम नसाल, तर काय करावे?
अनेकदा प्रत्येकाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी घर खर्चासोबत कर्जाचा हप्ता फेडणे, सर्वसामान्य व्यक्तीला जमत नाही. ज्यामुळे कर्जाचे हप्ते बुडवले जातात किंवा चुकवले जातात. ज्यावेळी तुम्ही आर्थिक समस्येमध्ये असाल, अशावेळी तुम्ही संबंधित बँकेला तुमच्या परिस्थितीबद्दल कल्पना द्यायला हवी आणि बँकेला वाढीव मुदत मागायला हवी. बऱ्याच वेळा आर्थिक समस्यांमध्ये नोकरी जाणे ही समस्या अतिशय कॉमन असते. अशावेळी कर्जाचा हप्ता कमी करण्यासाठी तुम्ही बँकेला विनंती करू शकता.
Source: hindi.news18.com