Car Loan: महागाई वाढत असतानाही आवडत्या कार खरेदीत भारतीय पुढेच आहेत. मागील काही महिन्यांपासून कार लोन घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. नव्या गाड्यांचा खप वाढत असताना जुन्या गाड्यांची विक्रीही तेजीत आहे.
चांगल्या स्थितीतील जुनी कार खरेदी करण्यासाठीही जास्त पैशांची गरज पडते. त्यासाठी कार लोन हा पर्याय आहे. मात्र, नवी किंवा जुनी कार खरेदीसाठी लोन घेताना व्याजदर सारखाच असतो का? बँक कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते ते आपण या लेखात पाहूया.
नवीन कारसाठी कर्ज घेताना
कमी व्याजदर
जुन्या कारपेक्षा नवीन कार घेताना बँक सहसा कमी व्याजदर आकारते. कारण, नव्या गाडीची रिसेल व्हॅल्यू जास्त असते. त्यामुळे कार मालकाची जोखीम कमी होते. नव्या कारपेक्षा जुनी स्वस्तात मिळत असली तरीही बँक सहसा व्याजदर जास्त आकारते. त्यामुळे इएमआय जास्त भरावा लागेल. त्या तुलनेत नवी गाडी खरेदीवर कमी व्याजदर आकारल्याने इएमआय कमी होईल.
कर्जाचा कालावधी
नव्या कारसाठी जे कर्ज घेता त्यासाठी कर्ज फेडण्याचा कालावधी जास्त असतो. तीन ते सात वर्षापर्यंत अनेक बँका कार लोन देतात. दरम्यान, दीर्घ कालावधी म्हणजे व्याजही जास्त द्यावे लागणार हे कर्जदाराने लक्षात घ्यावे.
कर्जाची रक्कम किती मंजूर होऊ शकते
नव्या काराचे बाजार मूल्य जास्त असते त्यामुळे कार लोनही जास्त मिळते. तुम्हाला कार घेताना जास्त पैसे तुमच्या खिशातून टाकण्याची गरज नाही. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि पूर्वीचे व्यवहार चोख असतील त्यांना 100% कार लोन मिळू शकते.
जुन्या कारसाठी कर्ज घेताना
जुन्या कारचा घसारा जास्त असल्याने कारचे मूल्यही कमी झालेले असते. त्यामुळे नव्या कारच्या तुलनेत जुनी कार घेताना बँक जास्त व्याजदर आकारते. जुन्या कारसाठी कर्ज देताना बँक जास्त जोखीम घेत असते. दरम्यान, ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो त्यांना कमी व्याजदर मिळू शकतो.
कर्जाचा कालावधी
नवी कार घेताना कर्जफेड करण्याचा कालावधी 7 वर्षांपर्यंत असतो. मात्र, जुनी कार खरेदी करताना सहसा बँका हा कालावधी 5 वर्षांपर्यंत ठेवते. दरम्यान, कमी कालावधी असल्याने व्याजही कमी भरावे लागते. तसेच गाडी लवकर नावावर होईल. वित्तसंस्था आणि कर्जदारानुसार हा कालावधी बदलू शकतो.
कर्जाची रक्कम
जुनी कार खरेदी करताना ग्राहकाला जास्त डाऊन पेमेंट करावे लागू शकते. गाडीचे वय, स्थिती, रिसेल व्हॅल्यू, घसारा यावर कर्ज किती मिळेल हे अवलंबून असते. जर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर डाऊन पेमेंट जास्त करावे लागू शकते. मात्र, क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर 80% पर्यंत कार लोन मिळू शकते.
जुनी किंवा नवी कोणतीही कार घेताना सर्वात आधी तुमची गरज ओळखा. तुमच्या बजेटमध्ये बसणारी कार निवडा. आर्थिक स्थिती नसतानाही फक्त एखादी गाडी आवडते म्हणून घेत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल. नव्या कारचा घसारा देखील जास्त असतो. त्यामुळे खरेदी केल्यानंतर पहिल्या काही वर्षात विक्री करायची असल्यास कमी किंमत मिळेल. दरम्यान, जुन्या कारचा घसारा आधीच जास्त झालेला असतो त्यामुळे जुनी कार विकण्याचा निर्णय घेतल्यास जास्त तोटा होणार नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            