सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने डेबिट कार्ड, ATM आणि POS मशीनसाठीची दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना क्लासिक डेबिट कार्ड वापरून एटीएममधून एका वेळी 75000 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. नवीन डेली लिमीट तात्काळ लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे.
बँकेच्या वेबसाईटनुसार आता ग्राहकांना क्लासिक डेबिट कार्ड वापरून एटीएममधून एका वेळी 75000 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 40000 रुपये होती. त्याशिवाय डेबिट कार्डने POS मशीन 200000 रुपयांचा व्यवहार करता येणार आहे. यापूर्वी क्लासिक डेबिट कार्ड वापरून POS मशीनने 100000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येत होते. कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची मर्यादा मात्र 25000 रुपयांवर कायम ठेवण्यात आली आहे.दररोज पाच वेळा प्रत्येकी 5000 रुपयांचे व्यवहार करता येतील.
दरम्यान, प्लॅटिनम बिझनेस किंवा सिलेक्ट डेबिट कार्डसाठी एटीएम मर्यादा 100000 रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.यापूर्वी या कार्ड्ससाठी 50000 रुपये मर्यादा होती. POS मशीनवर प्लॅटिनम बिझनेस किंवा सिलेक्ट डेबिट कार्डचा वापर करुन आता चक्क 500000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. यापूर्वी ही व्यवहार मर्यादा 200000 रुपये इतकी होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार कार्ड व्यवहारांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. ग्राहकांना व्यवहार मर्यादा निश्चित करण्यासाठी पर्याय देण्याची सुविधा उपलब्ध केली असल्याचे कॅनरा बँकेने म्हटलं आहे.