आरबीआयने (RBI – Reserve Bank of India) डिजिटल रुपी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांना 1 डिसेंबर 2022 पासून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी व्यवहारांसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, सुरुवातीला त्याचे पायलट लॉंचिंग होत आहे. म्हणजेच चार शहरांमध्ये याची सुरुवात होत आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरचा समावेश आहे. आरबीआयच्या डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC- Central Bank Digital Currency) असे नाव देण्यात आले आहे. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल. डिजिटल स्वरुप अर्थात आर डिडिटल टोकन स्वरुपात असेल, असे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सांगितले. खरंतर गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरबीआय डिजिटल चलन बाजारात आणणार असल्याचं म्हटलं होतं. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे.
Table of contents [Show]
आपण दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे हस्तांतरित करु शकतो का?
डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून डिजिटल रुपयांचा वापर करण्यात येणार असल्याचे आरबीआयने सांगितले. आरबीआयने काही बँकांची निवड केली आहे, जी हे वॉलेट देईल. हे वॉलेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये असेल. आपण डिजिटल पैशाचा वापर दुसऱ्या या व्यक्तीकडे पैसे हस्तांतरित करण्यासाठी किंवा दुकानदाराला पैसे देण्यासाठी करु शकाल. म्हणजे रोजच्या खरेदीसाठी तुम्ही त्याचा वापर करु शकाल. यामुळे तुम्हाला तुमच्या खिशात किंवा पाकिटात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही.
कोणत्या बँका देणार डिजिटल रुपी?
या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 8 बँकांची निवड डिजिटल रुपी देण्यासाठी करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ 4 बँकाच ती देणार आहेत. पुढे बाकीच्या बँकांचाही त्यात समावेश केला जाणार आहे. पहिल्या चार बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकही ही ऑफर देणार आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, डिजिटल रुपया आधीच अस्तित्वात असलेल्या कागदी चलन आणि नाण्यांच्या मूल्यात जारी केला जाईल.
दुसऱ्या टप्प्यात ही शहरे सुरु होणार
आरबीआयने दुसऱ्या टप्प्यात अनेक शहरांमध्ये डिजिटल रुपे बाजारात आणण्याची योजना आणली आहे. यामध्ये अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनऊ, पाटणा आणि शिमला यांचा समावेश आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, पायलट लॉंचचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर, इतर बँका आणि स्थाने देखील डिजिटल रुपी इकोसिस्टम अंतर्गत समाविष्ट केली जातील.
डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सी सारखीच आहे का?
आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मध्यवर्ती बँक डिजिटल चलन किंवा डिजिटल रुपी क्रिप्टोकरन्सीपेक्षा खूप वेगळी आहे. आपण याची तुलना बिटकॉइन, इथेरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीशी करू शकत नाही. आरबीआय आणि सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापराबद्दल अनेक वेळा चिंता व्यक्त केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे.