भारतीय रेल्वेचे जाळे हे संपूर्ण देशात विस्तारले आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी पसंती दर्शवतात. रास्त तिकीट दर आणि सर्वोत्तम सुविधेमुळे अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. अनेकदा आपण प्रवासाचे तिकीट बुक करतो. मात्र अचानक प्रवासापूर्वी आपला प्लॅन चेंज होतो, ज्यामुळे आपल्या तिकिटावर इतर कोणीतरी प्रवास करावा अशी आपली इच्छा असते.
ऑनलाईन तिकीट बुक (Online Ticket Booking) करताना आपल्याकडून झालेल्या छोट्या चुकीमुळे तिकिटावरील नावात बदल होतो आणि चुकीच्या नावाने तिकीट बुक होते. अशा परिस्थितीत बरेच जण तिकीट कॅन्सल करतात किंवा नवीन तिकीट काढतात. बुक केलेल्या तिकीटवरील नाव बदलण्याची सुविधा भारतीय रेल्वे देते की नाही याबाबत लोकांना माहिती नसते. यासंदर्भात भारतीय रेल्वेचा नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.
रेल्वेचा नियम काय सांगतो?
IRCTC कडून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे बुक केलेल्या तिकीटवरील नाव बदलण्याची सुविधा देखील देण्यात येते. मात्र ही सुविधा प्रवासी एकदाच वापरू शकतात.
प्रवाशाने रेल्वेचे तिकीट ऑनलाईन (Online) किंवा ऑफलाईन (तिकीट काउंटरवरून)(Offline) पद्धतीने जरी खरेदी केले असले, तरीही तिकीटवरील नाव बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे नाव बदलण्यासाठी प्रवाशाला रेल्वेच्या तिकीट काउंटरवर जावे लागेल. त्या ठिकाणी तिकिटांची झेरॉक्स (Ticket Photocopy) आणि ज्या व्यक्तीचे नाव तिकिटावर नमूद करायचे आहे त्याच्या ओळखपत्राची झेरॉक्स (Identification Photocopy ) द्यावी लागेल. त्यानंतर तिकीट काउंटरवरून नाव बदलले जाईल.
तिकिटावर जर नाव बदलायचे असेल, तर काही नियमांचे पालन करावे लागेल. रेल्वे प्रवासाला निघण्याच्या 24 तास वेळेअगोदर प्रवाशाला नावात बदल करता येईल. रिजर्वेशन काउंटरवरून (Reservation Counter) हे नाव बदलले जाईल. 24 तासानंतर ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार नाही.
बदली स्वरूपात कोणाचे नाव देता येते?
बुक केलेल्या रेल्वेच्या तिकिटावर नाव बदलता येत असले, तरीही बदली नावांमध्ये आई -वडील, बहीण- भाऊ, मुलगा-मुलगी आणि पती- पत्नी यांचीच नावे बदली स्वरूपात देता येतात. मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांची नावे बदलीसाठी देता येत नाही.
बोर्डिंग स्टेशन बदलता येते का?
जर तुम्हाला नावाप्रमाणे बोर्डिंग स्टेशन (Boarding Station) देखील बदलायचे असेल, तर IRCTC तुम्हाला ती सुविधा देत आहे. मात्र यामध्ये एक अट घालण्यात आली आहे. या अटीनुसार ऑफलाईन बुक केलेल्या तिकीटवरील बोर्डिंग स्टेशन प्रवाशाला बदलता येणार नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने तिकिटाची बुकिंग केली असेल, तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे.