SCSS Account Closure: सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खातेही सुरू करू शकतो. मात्र, सर्व खाते मिळून 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. निवृत्तींनतर ज्येष्ठ नागरिकांना निश्चित परतावा मिळावा या दृष्टीकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
55 वर्षांपुढील मात्र, 60 वर्षांच्या आतील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करता येईल. तसेच 60 वर्षांपुढील आणि लष्करातून निवृत्त झालेल्या 50 वर्ष वयाच्या व्यक्तीलाही या योजनेत गुंतवणूक करता येईल. SCSS खाते कधीही बंद करता येते का त्यासाठी किती दंड आकारला जातो, ते आपण या लेखात पाहूया.
SCSS योजनेवरील व्याजदर काय? (SCSS Rate of interest)
या योजनेच्या व्याजदराचा सरकारकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीसाठी 8.2% इतका व्याजदर या योजनेवर दिला जात आहे. या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा पूर्णत: करमुक्त असून दर तीन महिन्यांनी खातेदाराला दिला जातो.
SCSS खाते कधीही बंद करता येते का? (Can SCSS account be closed anytime?)
SCSS खात्याचा मुदत कालावधी 5 वर्षांचा आहे. मात्र, मॅच्युरिटीनंतर तीन वर्षांनी मुदत कालावधी वाढवता येतो. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर तीन वर्षांची मुदत वाढवता येते. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत SCSS खाते सुरू करता येईल. फॉर्म -2 भरून गुंतवणूकदार कधीही खाते बंद करू शकतो.
1) जर एक वर्षाच्या आत SCSS खाते बंद केले तर त्या वर्षात दिलेले व्याज कापून गुंतवणुकीची रक्कम माघारी दिली जाते.
2) एक वर्षानंतर मात्र, दोन वर्ष पूर्ण होण्याआधी खाते बंद केले तर एकूण गुंतवणूक रकमेच्या 1.5% शुल्क कापून उर्वरित रक्कम खातेदाराला माघारी दिली जाईल.
3) दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर SCSS खाते बंद करत असाल तर ठेवीच्या 1% शुल्क कापून घेतले जाईल आणि बाकी रक्कम खातेदाराला माघारी दिली जाईल.
किती रक्कम गुंतवता येते?
SCSS योजनेत कमीतकमी 1000 रुपये गुंतवता येतात. तर जास्तीत जास्त 1000 च्या पटीत 30 लाख रुपयापर्यंत रक्कम ठेवता येते. दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर एका आर्थिक वर्षात आयकर कायद्यानुसार करातून सूट मिळते. जर परतावा 50 हजारांच्या पुढे मिळत असेल तर TDS लागू होतो.
खाते बंद करण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल?
वर सांगितल्याप्रमाणे नियमानुसार खाते बंद करता येऊ शकते. पाच वर्षांच्या मुदतीआधीही खाते बंद करता येते. तसेच तीन वर्षांची मुदत वाढवून घेतल्यानंतर 8 वर्षांनी खाते बंद करता येते. त्यासाठी Form-3 भरावा लागेल. फॉर्म -3 ला अॅप्लिकेशन ऑफ क्लोजर असे म्हणतात.