अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. कोरोना आणि नंतर महागाईचा तडाखा सहन करणार्या सामान्य माणसाला या अर्थसंकल्पात करसवलतीची आशा आहे. अशा परिस्थितीत सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी श्रीमंतांवर अतिरिक्त कर किंवा संपत्ती कर लावणार का? याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. ऑक्सफॅमने नुकताच जगातील संपत्ती आणि त्यात श्रीमंत आणि सामान्य लोकांचा वाटा यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तेव्हापासून श्रीमंतांवर अतिरिक्त कर लादण्याची चर्चा सुरु झाली आहे.
Table of contents [Show]
वेल्थ टॅक्स काय आहे?
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अनेकदा श्रीमंतांवर संपत्ती कर लादण्याची मागणी केली जाते. यामध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मालमत्तेच्या मालकाकडून काही अतिरिक्त कर घेण्याचे सांगितले जाते. पण अशाप्रकारच्या कराचे प्रमाण खूपच कमी आहे. आर्थिक विषमता दूर करण्याचा हा प्रकार योग्य मार्ग असू शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वेल्थ टॅक्समुळे करचोरी वाढू शकते
फायनान्शिअल एक्सप्रेसने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) चे प्राध्यापक सच्चिदानंद मुखर्जी यांचे म्हणणे उद्धृत केले की, असमानता आणि गरिबी दूर करण्याचा योग्य मार्ग म्हणजे सरकारने आपला खर्च वाढवणे आणि वितरण व्यवस्था व्यवस्थित ठेवणे. ते म्हणतात की जर अधिक श्रीमंत लोकांवर अतिरिक्त कर लादला गेला तर ते अशा देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे जिथे असे कोणतेही कर नाहीत. त्याच वेळी, काही तज्ज्ञांचे असे मत आहे की असे पाऊल करचुकवेगिरी वाढवू शकते.
जगातील गरिबी दूर होईल
ऑक्सफॅमच्या अहवालात असे म्हटले आहे की 2020 नंतर जगात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी सुमारे दोन तृतीयांश संपत्ती जगातील केवळ 1 टक्के श्रीमंत लोकांच्या ताब्यात आहे. जगातील 99 टक्के लोकसंख्येकडे असलेली संपत्ती दुप्पट आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात असेही म्हटले आहे की, जगातील या 1 टक्के लोकांवर केवळ 5 टक्के कर लावला तर 2 अब्ज लोक गरिबीतून मुक्त होऊ शकतात. या करातून सरकारांना 1,700 अब्ज डॉलर पर्यंत मिळणे अपेक्षित आहे.
अलीकडेच एक अनोखे दृश्य पाहण्यात आले जेव्हा जगातील अनेक श्रीमंत लोक स्वतःवर 'अधिक कर लादण्या'बद्दल बोलत होते. 'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, जगातील 205 अब्जाधीश आणि अब्जाधीशांच्या समूहाच्या सदस्यांनी सरकारकडे कर आकारण्यास सांगितले आहे. जेणेकरून कोट्यवधी लोकांना मदत करता येईल. डिस्नेची वारसदार अबीगेल डिस्ने, 'द हल्क' अभिनेता मार्क रफालो यांनी दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 'भीषण असमानता' दूर करण्यासाठी शक्य तितक्या लवकर संपत्ती कर लागू करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहिले. या गटात 13 देशांतील लोकांचा समावेश आहे.