मुंबई महानगरपालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे दिला जाणार दिले आहेत. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान दिले जाणार आहे. सरकारच्या आर्थिक साक्षरता मिशन कार्यक्रमांतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेडच्या (BSEIL) सहकार्याने इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केटसह आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या 100 शिक्षकांना बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या इन्स्टिट्यूटकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे शिक्षक शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक पैशांच्या महत्त्वापासून त्याचा योग्य वापर कसा करायचा, पैशांची बचत कशी करायची, आर्थिक नियोजन करायचे म्हणजे काय करायचे, याचे शिक्षण देणार आहेत. तसेच बँकांचे कामकाज कसे चालते, नोटा कोण छापतं, ऑनलाईन बॅंकिंगमुळे डिजिटल पेमेंटचे उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय याविषयीची माहिती त्याचबरोबर शेअर मार्केट, मनी मार्केट याची माहितीही टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
आर्थिक साक्षरता म्हणजे काय?
पैसे काय आहेत, पैशांचा वापर कुठे, कशासाठी आणि कशा पद्धतीने करतो, याचे सारासार भान असणे आणि एकूणच आपल्या पैशासंबंधीचे व्यवहार स्वतंत्रपणे निर्णय घेऊन करता येणे, म्हणजे आर्थिक साक्षरता. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हा आर्थिक साक्षरतेचा महत्त्वाचा भाग आहे.
सध्याच्या काळात आर्थिक साक्षरतेचे ज्ञान असणे हे खूप आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान मिळाले तर भविष्यात त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकातील माहिती आणि प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान याची योग्य सांगड घालता येईल.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेड
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट भांडवली बाजारातील भागधारकांना आर्थिक तंत्रज्ञान, आर्थिक सुरक्षितता, मार्केट, सायबर सिक्युरिटी, जोखीम व्यवस्थापन (Risk management), डेटा सायन्स याबद्दचे प्रशिक्षण आणि सेवा पुरवते.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
- विद्यार्थ्यांना आर्थिक पैशांच्या महत्त्वापासून त्याच्या योग्य वापराचे, बचतीचे नियोजन कळेल.
- बँकांचे महत्त्व, बँकांचे कामकाज, रिझर्व्ह बँकेची भूमिका, महत्त्वाचे कामकाज, शेअर मार्केट, मनी मार्केट याची माहिती मिळणार.
- याशिवाय विद्यार्थ्यांना बचतीची गरज, महत्त्व आणि बचतीचा योग्य विनिमय याचेही ज्ञान दिले जाणार.
- मुंबईतील आठवी-नववीच्या सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांना या व्यावहारिक ज्ञानाचा होणार फायदा.