बॉलिवूडमधील लगान, जोधा अकबर अशा सिनेमांमध्ये भव्यदिव्य सेट उभे करणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि एन.डी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. आज बुधवारी 2 ऑगस्ट 2023 रोजी कर्जतमधील स्टुडिओमध्ये देसाई यांनी गळफास घेतला. 249 कोटींचे कर्ज आणि स्टुडिओ जप्तीची नोटीस आल्याने नैराश्यात असलेल्या देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. देसाई यांच्या आत्महत्येने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन देसाई यांनी एन.डी स्टुडिओसाठी सीएफएम फायनान्स कंपनीकडून 180 कोटींचे कर्ज घेतले होते. ते मुदतीत कर्जफेड करु शकले नाहीत. त्यामुळे व्याज आणि विलंब शुल्कामुळे कर्जाचा डोंगर 249 कोटींपर्यंत वाढला होता. कोरोना काळात चित्रपटांचे शुटींग पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे देसाई यांची आर्थिक स्थिती बिकट झाली.
कर्ज घेताना देसाई यांनी त्यांच्याकडील एकूण 36 एकर जागा तारण म्हणून ठेवली होती. सीएफएम कंपनीने नितीन देसाई यांची बुडीत कर्ज एडलवाईज असेट कंपनीला विक्री केली. एडलवाईज कंपनीने एन.डी स्टुडिओसह नितीन देसाई यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. ही प्रोसेस सुरु झाल्याने देसाई काही महिन्यांपासून तणावात होते. अखेर आज बुधवारी त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवले.
गणेशोत्सवात लालबागमध्ये लागायचे देसाई यांचे भव्य सेट
मुंबईतील गणेशोत्सव भव्यदिव्य सजावटींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. याच सजावटींमध्ये नितीन देसाई यांचे सेट्स आकर्षणाचे केंद्रबिंदू असायचे. देसाई यांनी लालबागमधील प्रमुख मंडळांसाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर सेट उभारले होते. यंदाच्या वर्षासाठी लालबागच्या राजा मंडळाचे सेट उभारणीचे काम देसाई यांना मिळाले होते.
कला दिग्दर्शनात राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
नितीन देसाई यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून वेगळा ठसा उमटवला होता. मूळचे दापोलीचे असेलेले देसाई यांनी मराठी आणि बॉलिवूडमधील अनेक वेगळ्या सिनेमांसाठी काम केले. त्यांना तीनवेळा फिल्मफेअर आणि चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यात हम दिल दे चुके सनम, देवदास आणि लगान या सिनेंमांसाठी देसाई यांना पुरस्कार मिळाले होते.
सिने कलाकारांकडून आदरांजली
नितीन देसाई यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली आहे. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंग रजपूत यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. देसाई यांच्या आत्महत्येची माहिती समोर येताच बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि राजकीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे.