Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Budget 2023 Health Sector: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पालिकेचा आखडता हात, हेल्थ बजेटमध्ये 624 कोटींची कपात

BMC Budget 2023

BMC Budget 2023 Health Sector: मुंबईकरांचे आरोग्य साथीचे रोग, प्रदूषण यामुळे धोक्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावर उपाय योजना करण्यात आली असली तरी पालिकेच्या बजेटमध्ये यंदा आरोग्याची तरतूद गेल्या वर्षाच्या तुलनेत 624 कोटींनी कमी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. यात आरोग्य सेवेसाठी पालिकेने 6309 कोटींची तरतूद केली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्य सेवेसाठीची तरतूद 624 कोटींनी कमी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पालिकेने आरोग्य सेवेसाठी 6933 कोटींची तरतूद केली होती. (BMC Health Budget 2023 cut Provision by 624 crore)

मुंबईकरांना रक्तदाब, मधुमेह, हायपर टेन्शन यासारख्या व्याधींनी ग्रासले आहे. जवळपास 34% मुंबईकर हायपर टेन्शनने त्रस्त असल्याचे पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.  मुंबईतील जीवनमान सुधारण्यासाठी पालिकेकडून आरोग्य कुटुंबम हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी मुंबईतील 35 लाख कुंटुंबांचे आरोग्य सेवक आणि आशा वर्करकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याचे डॉ. चहल यांनी सांगितले.

यंदा आरोग्यासाठी पालिकेने 6309 कोटींची तरतूद केली आहे. गेली दोन वर्ष कोव्हीडसाठी पालिकेने मोठा खर्च केला होता. आता पालिका मुंबईतील असंसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी  (non-communicable diseases- NCD)काम करेल, असे त्यांनी सांगितले. पालिकेने भगवती हॉस्पिटलच्या पुनर्विकासासाठी 110 कोटी, एम. टी अगरवाल रुग्णालयाच्या विस्तारासाठी 95 कोटी,  कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयासाठी 75 कोटी, भांडूपमधील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 60 कोटी , वांद्रेमधील भाभा रुग्णालयासाठी 53 कोटी आणि इतर प्रमुख रुग्णालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. (BMC Hospitals Modernization) 

'आपला दवाखाना' साखळी आणखी विस्तारणार 

मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या मुंबई शहरात आणि उपनगरात 106 आपले दवाखाने कार्यरत आहे. येत्या 31 मार्च 2023 अखेर ही संख्या 208 पर्यंत वाढेल, असे डॉ. चहल यांनी सांगितले. पुढील वर्षात आपल्या दवाख्यांची संख्या 62 ने वाढवून ती 270 इतकी होईल असे डॉ. चहल यांनी सांगितले.