एकदा जोशी काकांना WhatsApp वर वीज बिलाचा मेसेज आला. त्यात म्हटलं होत की, ‘आज संध्याकाळी 9 वाजता तुमचे लाईट कनेक्शन काढून टाकले जाणार आहे, कारण तुम्ही बिल वेळेत भरले नाहीये. तसेच लवकरात लवकर लाईट बिल भरा आणि तुमचे अपडेटेड वीज बिल मिळवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन करा’.
हा मेसेज वाचल्यानंतर, आज रात्रीतून आपले लाईट कनेक्शन काढून टाकले जाणार आणि आपल्याला अंधारात रात्र काढावी लागणार या चिंतेने जोशी काकांनी लगेचच मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर कॉल केला. एका हिंदी भाषिक व्यक्तीने फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली.
मी दर महिन्याला वेळेत बिल भरतो आणि माझे कुठेलेही वीज बिल थकलेले नाही असा दावा जोशी काकांनी केला. ‘’बिजली विभाग’ शी संबंधित अधिकारी म्हणून ओळख सांगणाऱ्या फोनवरील व्यक्तीने जोशी काका चिंतेत आहेत हे बरोबर ओळखलं आणि त्यांना ‘मी अद्ययावत बिल किती आहे हे सांगतो आणि ते बिल तुम्ही लागलीच गुगल पे वर भरा’ असं सांगितलं आणि फोन ठेवला.
दुसऱ्या मिनिटालाच जोशी काकांना पुन्हा एक WhatsApp मेसेज आला आणि त्यात बिलाची रक्कम आणि गुगल पेचा नंबर लिहिलेला होता. जोशी काकांनी घाई गडबड करत लागलीच बिल भरलं. दुसऱ्या दिवशी महावितरण कार्यालयातून जाऊन त्यांनी याबद्दल चौकशी केली तेव्हा अशाप्रकारे आम्ही कुठलेही बिल WhatsApp वर पाठवत नाही किंवा लगेच पैसे भरा म्हणून कॉल देखील करत नाही असं सांगण्यात आलं. तसचं तुम्ही वेळेवर सगळे वीज बिल भरले आहेत आणि तुमची कुठलीही थकबाकी नाही असं देखील त्यांना सांगण्यात आलं. आता जोशी काकांना कळून चुकल की, त्यांची फसवणूक झाली आहे.
असा अनुभव फक्त जोशी काकांचाच नाहीये, तर आपल्या आजूबाजूला असे किती तरी व्यक्ती आहेत ज्यांची अशाप्रकारे फसवणूक केली गेली आहे. Truecaller च्या एका अहवालानुसार गेल्या वर्षात भारतातील शेकडो लोकांची अशी फसवणूक झाली असून, सायबर चोरांनी सुमारे 100,00,000 रुपये लंपास केले आहेत. ही रक्कम केवळ ज्या गुन्ह्यांची नोंद केली गेली आहे त्याच आधारावर आहे. अशी अनेक पप्रकरणे आहेत ज्यात गुन्हे दाखल केले गेलेले नाहीत. अहवालानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वात जास्त अशी प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच मुंबई आणि बेंगळूरू या शहरांत फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आर्थिक फसवणूकीपासून कसे वाचाल?
- वीज बिलाची माहिती वीज पुरवठा करणारी कंपनी (महावितरण, टाटा, बेस्ट इत्यादी) कधीही WhatsApp मेसेजद्वारे देत नाही.
- वीज बिल दर महिन्याला वीज पुरवठा करणारी कंपनी तुमच्या घरी आणून देत असते, त्यात किती वीज वापरली, त्याचे दर, रीडिंग आदी गोष्टी नमूद केलेल्या असतात, त्यानुसारच बिल आकारले जाते.
- जेव्हा कुणी व्यक्ती तुमच्याशी बिलासंदर्भात फोन करेल तेव्हा त्यांना त्यांचे नाव, पत्ता, पद, कार्यालयाचा पत्ता विचारायला विसरू नका.
- कुणाशीही गूगल पे, पेटीएम इत्यादी गेटवे पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करू नका.
- तुमची खासगी माहिती, बँकेचे तपशील कुणालाही देऊ नका.
- तुम्हांला कुठलीही शंका आल्यास थेट वीज कार्यालयात जाऊन शहानिशा करून घ्या.