Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apps for Financial Literacy: आर्थिक साक्षरता वाढवणारे 'हे' 6 अ‍ॅप्स माहितीये का?

apps for Financial Literacy

बचत, गुंतवणूक, शेअर मार्टेक ट्रेडिंग, पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याची अनेकांना माहिती नसते. तसेच जे काही ज्ञान असते ते वरवर ऐकीव माहितीवर आधारित असते. मात्र, बाजारात अशी काही अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवू शकता. एकही पैसा वाया न घालता आभासी ट्रेडिंग शिकू शकता.

Apps for Financial Literacy: भारतातील फक्त 25 टक्के नागरीक अर्थसाक्षर असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे. बचत, गुंतवणूक, पैशांचे व्यवस्थापन, आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळावी याची अनेकांना माहिती नसते. मात्र, बाजारात अशी काही अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवू शकता. 

तरुण वयातच आर्थिक साक्षरतेचे धडे घेतले तर पुढील आयुष्याचे नियोजन योग्य होईल. अ‍ॅप्सद्वारे तुम्ही दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा आर्थिक साक्षरतेचे धडे गिरवू शकता. दुसऱ्याकडून मिळालेल्या माहितीपेक्षा स्वत: अभ्यास करून निर्णय घेतलेले कधीही चांगले. पाहूया आर्थिक साक्षरतेसंबंधी गुगल प्लेस्टोअरवरील कोणते प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत. 

ट्रेडिंग गेम अ‍ॅप

ट्रेडिंग गेम हे अ‍ॅप ioS किंवा गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळेल. हे अ‍ॅप 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केले आहे. तसेच याची रेटिंग 4.4 आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप मोफत आहे.

यावर तुम्ही रिअल टाइम शेअर मार्केट आकडेवारीद्वारे आभासी ट्रेडिंग शिकू शकता. स्टॉक मार्केट, क्रिप्टो, गुंतवणूक या विषयांवर अनेक धडे आहेत. ज्याद्वारे तुमच्या मूलभूत आर्थिक संकल्पना स्पष्ट होतील. तसेच पैशांची काहीही जोखीम न घेता आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) ट्रेडिंग शिकता येईल. यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल.   

INVESTMATE अ‍ॅप 

हे अ‍ॅप सुद्धा 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केले आहे. याला 4.6 स्टार रेटिंग आहे. पर्सनल फायनान्स संबंधी माहिती, प्रश्नोत्तरे, सोप्या शब्दात आर्थिक संकल्पना समजून घेता येतील. ट्रेडिंग कशी करावी, डमी ट्रेडिंग, कमॉडिटी मार्केट, स्टॉक्स, इंडेक्स याबाबत शिकायला मिळेल. वैयक्तिक ट्रेडिंग रणनीती आखण्यास INVESTMATE अ‍ॅप मदत करेल. 

FORTUNE CITY अ‍ॅप

फॉर्च्युन सिटी अ‍ॅप हे 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केलेले आहे. मात्र, या अ‍ॅपचे फिचर्स तुम्हाला पैसे भरून वापरावे लागतील. 80 ते 8000 रुपयांपर्यंत खर्च असू शकतो.

या अ‍ॅपद्वारे तुमचे उत्पन्न आणि खर्च गेमद्वारे ट्रॅक करता येतात. एका आभासी शहराच्या गेम स्वरूपात तुम्हाला बजेट, खर्च, गुंतवणूक, आर्थिक ध्येय या गोष्टी शिकता येतील. तुम्ही तुमचे आर्थिक टार्गेट सेट करू शकता. हे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर रिवॉर्ड्स दिले जातात. गेम आणि फायनान्सचा संगम अ‍ॅपमध्ये साधण्यात आला आहे. 

MONEY MASTERS अ‍ॅप

मनी मास्टर्स अ‍ॅपद्वरे तुम्ही गेममधून आर्थिक नियोजन कसे करावे हे शिकू शकता. मात्र, हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला 920 ते 6,400 पर्यंत शुल्क लागू शकते. फायनान्स गुंतवणूक आणि बचतीच्या संकल्पना शॉर्ट व्हिडिओच्या मदतीने समजून घेता येतील. गेम्स, प्रश्नावलीच्या माध्यमातून तुमचे ज्ञान तपासता येईल. आभासी चलनाच्या साह्याने तुम्ही ट्रेडिंगही करू शकता. 

YZER अ‍ॅप

सोप्या व्हिडिओच्या माध्यमातून गुंतवणूक, बचत, शेअर मार्केटसंबंधी संकल्पना समजावून घेता येतील. गुंतवणुकीचे मार्ग, भांडवली बाजार, शेअर विश्लेषणही समजून घेता येईल. बिटकॉइन, ब्लॉकचेन सारखे किचकट विषयांच्या संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगितल्या आहेत. हे अ‍ॅप मोफत आहे.   

MYMONII अ‍ॅप 

हे अ‍ॅप गुगल अ‍ॅप स्टोअरवर 50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर 50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केले आहे. तुमच्या मुलांना अर्थसाक्षर करण्यासाठी हे अ‍ॅप मदत करेल. बचत खाते, गुंतवणूक, खर्च कसे सांभाळायचे हे मुलांना शिकवता येईल. मुलांना मिळणारा पॉकेट मनी, खर्च टॅक करता येईल.