कार विकत घेताना विमा सोबत येतो, मात्र एक वर्षानंतर बऱ्याचदा कार इन्शुरन्सचे नुतनीकरण होत नाही. ज्यामुळे रस्त्यांवर विना इन्शुरन्स धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने नुकताच वाहनांसाठी थर्डपार्टी विमा बंधनकारक केला आहे. ज्या कारचा किमान थर्डपार्टी विमा नसेल, अशा वाहनधारकांना 5000 रुपये दंड किंवा 3 वर्ष तुरुंगवास अशी कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी आणि वाहनाच्या सुरक्षेसाठी कार इन्शुरन्स आवश्यक बनला आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहनांसाठी दिर्घकालीन विम्याचा पर्याय सुरु केला आहे. यात वाहनधारकांना कारचा 3 वर्षांपर्यंत विमा काढता येईल. दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांपर्यंत विमा पॉलिसी घेणे आता शक्य झाले आहे. जास्त मुदतीच्या विम्याचे ग्राहकांना अनेक फायदे आहेत.
दिर्घकाळासाठी वाहनाचा विमा घेतला तर प्रिमीयममध्ये काही प्रमाणात सवलत मिळते. प्रत्येक जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ही सवलत वेगवेगळी असते. शिवाय ती वाहनांच्या किंमतीनुसार आणि विमा कालावधीनुसार ठरवली जाते. त्यामुळे कार इन्शुरन्सबाबत अनेक पर्यायांचा ग्राहक विचार करु शकतात. तीन वर्षांसाठी एकदाच विमा काढल्याने प्रिमीयम दरवाढीपासून सुटका होते. विमा कंपन्यांकडून दरवर्षी विमा प्रिमियमचा महागाई दरानुसार आढावा घेतला जातो. महागाईचा दर, कर प्रणाली, निकाली काढलेले विमा दावे आणि कंपन्यांचा खर्च यावरुन विमा प्रिमीयम ठरवला जातो. ऑनलाईन विमा विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून वाहन विम्यावर सवलत देतात.
दिर्घ मुदतीचा विमा घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे दरवर्षी तुम्हाला विमा पॉलिसी रिनिव करण्याची आवश्यकता नाही. 3 वर्षासाठी विमा पॉलिसी काढली तर सलग सुरु राहते. जेव्हा एक वर्षाचा इन्शुरन्स असतो तेव्हा ग्राहकांना आठवणीने मुदत संपण्यापूर्वीच पॉलिसीचे नुतनीकरण करावे लागते. विम्याची मुदत संपली तर मग गाडीचे परिक्षण केले जाते आणि मगच पॉलिसी इश्यू केली जाते. हे टाळण्यासाठी सलग तीन वर्षांची पॉलिसी घेणे केव्हाही फायदेशीर मानले जाते.
तीन वर्षांच्या विमा पॉलिसींमध्ये मात्र नो क्लेम बोनस मिळत नाही. तुमच्याकडून तीन वर्षात विम्यासाठी दावा झाला नाही तर त्याचा कोणताही फायदा तुम्हाला मिळणार नाही. या उलट एक वर्ष मुदतीच्या इन्शुरन्समध्ये दावा झाला नाही तर पुढील वर्षी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करताना नो क्लेम बोनस दिला जातो.