Filing ITR Before 31st July : दरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर स्वरुपात सरकारला द्यावा लागतो, त्याला इन्कम टॅक्स भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स न भरल्यास करदात्यांना दंड भरावा लागतो. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आत इन्कम टॅक्स भरणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. 31 जुलैपूर्वी इन्कम टॅक्स भरण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Table of contents [Show]
कर्ज सहज उपलब्ध होईल
कर्ज घेताना बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था प्रथम तुम्हाला तुमचे उत्पन्न विचारते. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला कर्ज दिले जाते.अशा स्थितीत तुम्ही दाखल केलेले आयकर विवरणपत्र उपयुक्त ठरू शकते. आयटीआर तुमच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यास उपयोगी ठरतं. अशा अनेक वित्तीय संस्था आहेत, ज्या तुमच्या आयटीआर मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे कर्ज देतात. त्यामुळे आयटीआर कर्ज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मुख्यत: गृहकर्जाच्या वेळी उत्पन्नाचा पुरावा म्हणून तीन वर्षाचा आयटीआर मगितला जातो. हा नियम सर्व सरकारी आणि निमसरकारी बँकांना लागू आहे.
कंत्राट मिळविण्यास आवश्यक
कंत्राटी व्यवसाय सुरु करण्यासाठी ITR खूप महत्वाचा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही विभागासाशी करार करायचा असेल, तर तुम्हाला आयटीआर दाखवावा लागेल. कोणत्याही सरकारी खात्यात कंत्राट मिळविण्यासाठी गेल्या पाच वर्षांचे आयकर विवरणपत्र द्यावे लागते.
व्हिसा मिळविण्यासाठी आवश्यक
दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसासाठी अर्ज करताना, तुम्हाला आयकर रिटर्नबाबत विचारणा केली जाते. यावेळी व्हिसा अधिकारी 3 ते 5 वर्षांचा ITR मागू शकतात. आयटीआरद्वारे हे तपासले जाते की, जी व्यक्ती आपल्या देशात येत आहे किंवा येऊ इच्छित आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे. म्हणूनच ITR भरणे आवश्यक आहे.
विमा संरक्षण मिळवण्यासाठी
कर्जाव्यतिरिक्त, जर तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घ्यायचे असेल, तर आयटीआर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अनेक विमा कंपन्या तुम्हाला विमा संरक्षण देताना आयटीआर मागतात. विमा कंपन्या तुमचे उत्पन्न आणि तुमची आर्थिक नियमितता तपासण्यासाठी आयटीआरचा उपयोग करतात.
मालमत्ता खरेदी आणि विक्री करणे सोपे
आयटीआर भरल्याने तुम्हाला घराची खरेदी-विक्री करण्यास, बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करण्यास आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होते. कारण अशा गोष्टींसाठी बँका आणि म्युच्युअल फंड कंपन्या तुमची आर्थिक परिस्थिती तपासण्यासाठी आयटीआर चेक करतात.