पती-पत्नीच्या आयुष्यात मूल आले की त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्या बाळाभोवतीच फिरते. बाळासाठी काय काय आणायचे, बाळाला एखादी गोष्ट आवडेल का याचाच ते विचार करत असतात. बाळ अगदी लहान असल्यापासूनच ते बाळाच्या भविष्याचा विचार करू लागतात. आपल्या बालपणी ज्या गोष्टी मिळाल्या नसतील त्या आपल्या मुलाला मिळाव्यात असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात.
मूल जन्माला आल्यावरच त्याला कोणत्या शाळेत टाकायचे याविषयी पालक विचार करायला लागतात आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जमवाजमव करायला लागतात. एवढेच नव्हे तर मूल मोठे झाल्यानंतर त्याला परदेशात जाऊन शिकायचे असल्यास त्याला किती खर्च होईल , त्यासाठी आतापासून आपण कशाप्रकारे बचत करू शकतो याचा देखील ते विचार करू लागतात.
आजकाल केवळ मुलांच्या शालेय शिक्षणावर खर्च करून भागत नाही. मुलांना नृत्य, गायन, पोहणे, विविध खेळ यांसारख्या गोष्टींचे क्लासेस लावायचे असतात आणि त्यासाठी देखील पालकांना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. मुलांचे छंद जोपासण्यासाठी पालक भरमसाठ पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. पूर्वीच्या काळी घरात चार ते पाच मुले असायची आणि ही मुले सरकारी शाळेत शिकायची. त्यामुळे त्यांचा शालेय खर्च खूपच कमी असायचा. त्यासोबतच पालकांना मुलांसाठी इतर कोणताही अधिकचा खर्च करायला लागायचा नाही. पण आजकाल एका मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे मूल व्हायच्या आधीपासूनच काहीजण आर्थिक नियोजनाला सुरुवात करतात. खरे तर मूल व्हायच्या आधी अथवा मूल लहान असतानाच मुलाच्या भविष्यासाठी पैसा गोळा करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालक विमा योजनेचा नक्कीच विचार करू शकता. या विम्यामुळे तुमच्या मुलाला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक सुरक्षितता मिळू शकते.
बालक विमा योजना कमी वयात काढावी
मूल शिक्षण घेत असते तेव्हा ते आर्थिक बाबींसाठी पालकांवर अवलंबून असते. काही मुले आपल्या पालकांना आर्थिक भार सोसावा लागू नये यासाठी नोकरी करून शिकतात. पण याचे प्रमाण खूपच कमी आहे. या सगळ्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक नियोजन करावे लागते. शिक्षणाचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हा खर्च कशाप्रकारे भागवायचा हा विचार करताना पालकांच्या नाकी नऊ येते. पण पालकांनी मूल अगदी लहान असताना बालक विमा योजनेत पैसे गुंतवले असतील तर मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणे सोपे जाते आणि मुलांच्या भविष्यासाठी पुरेसा निधी जमा होतो.
योग्य वयात पैसे मिळतात
मूल लहान असताना त्याच्या शालेय शिक्षणावर तितकासा खर्च करावा लागत नाही. पण मूल एकदा कॉलेजला जायला लागले की, शिक्षणाचा खर्च वाढतो. मुलांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, कॉलेजसोबतच कोणता कोर्स करायचा हे आजकाल मुलं आधीपासून ठरवतात. या सगळ्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो आणि त्यातही काही मुलांना दहावी-बारावीनंतर परदेशात शिकण्याची इच्छा असते. त्यामुळे मुलाच्या 15 व्या वर्षापासून खऱ्या अर्थाने जास्त खर्च करावा लागतो असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तुम्ही बालक विमा योजनेचा हफ्ता न चुकता व्यवस्थित भरत असेल तर तुम्हाला ही योजना संपल्यानंतर या योजनेचे सगळे लाभ योग्यप्रकारे मिळतात. त्यामुळे मुलाला खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी पैशांची गरज असते. त्यावेळी तुम्ही त्याला एक मोठी रक्कम देऊ शकता.
मुदतीच्या आधी पैसे काढू शकता
काही बालक विमा योजनेत तुम्ही मुदतीच्या आधी पैसे काढू शकता. ग्राहकाच्या गरजेनुसार बालक विमा योजनेचे स्वरुप ठरवून मध्यम कालावधीच्या खर्चासाठी ठराविक रक्कम काढण्याची सुविधा अनेक विमा कंपन्या देतात. या सुविधेमुळे अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे पालकांना टेन्शन येत नाही आणि त्यांचे आर्थिक नियोजन देखील बिघडत नाही.
पालकांच्या मृत्यूनंतरही संरक्षण मिळते
आपल्या पश्चात देखील आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यामुळे बरेच पालक फक्त स्वत: जीवन विमा काढतात. पण त्यासोबत बालक विमा काढला तर यातून पालकांच्या निधनानंतर मुलाला आर्थिक सरंक्षण मिळते. तुमच्या निधनानंतर देखील तुमच्या मुलाच्या भविष्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बालक विमा योजने अंतर्गत योजनेत नॉमिनी असलेल्या व्यक्तीला रक्कम लगेचच दिली जाते. एवढेच नव्हे तर आई-वडिलांपैकी ज्यांच्या नावावर विमा आहे, त्यांचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्या पुढील हफ्ते देखील माफ करू शकते.